breaking-newsपुणे

निष्ठेने लिहिणारी माणसे हीच माझ्यासाठी वारसा

  • सत्कार समारंभात डॉ. अरुणा ढेरे यांची भावना

निष्ठेने लिहिणारी माणसे हीच माझ्यासाठी वारसा स्वरूपात लाभली आहेत, अशी भावना साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी रविवारी व्यक्त केली. मौखिक परंपरांचे महत्त्व, मावळातील मुक्कामामुळे ग्रामीण जग आणि आधुनिक शहर याच्या मध्यरेषेवर मी उभी आहे. मध्यरेषेवर म्हणजेच कुंपणावर असतो त्याला दोन्हीकडचे प्रदेश दिसतात, असेही त्यांनी सांगितले.

मुक्तछंद संस्थेतर्फे ‘भेट साहित्य शारदेची’ कार्यक्रमात सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते अरुणा ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ढेरे बोलत होत्या. ‘ऐसी अक्षरे’च्या अरुणा ढेरे विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे, सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ, ज्येष्ठ अभिनेत्री दीपा श्रीराम, ज्येष्ठ कथक गुरू शमा भाटे, मुक्तछंद संस्थेच्या आमदार मेधा कुलकर्णी, ‘ऐसी अक्षरे’चे समीर बेलवलकर आणि संपादक पद्मनाभ हिंगे या वेळी उपस्थित होते. सुधीर गाडगीळ यांनी अरुणा ढेरे यांची मुलाखत घेतली. उत्तरार्धात अरुणाताईंच्या साहित्यावर आधारित ‘नव्या जुन्याच्या काठावरती’ हा अभिवाचन, गीत आणि संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला.

भाषेशी आपलं नातं आहे. पण, कधी कधी विचार व्यक्त करण्यासाठी शब्द तोकडे पडतात. मोठी विशेषणं वापरली, की आपण लहान असल्याची जाणीव होते. मला लहानच राहू द्या आणि काही मोठी कामे करण्याचे बळ मिळावे या सदिच्छा द्याव्यात, अशी भावना ढेरे यांनी प्रदर्शित केली.

‘मराठी साहित्याच्या प्राचीवर अरुणोदय’.

साहित्य संमेलनाध्यक्षपदी अरुणाताई यांच्या बिनविरोध निवडीने मराठी साहित्याच्या प्राचीवर अरुणोदय झाला आहे. अरुणाताई यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दुर्गाबाई भागवत व सुनीताबाई देशपांडे यांचा करारीपणा आणि शांताबाई शेळके यांचा गोडवा आहे, अशा शब्दांत सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी ढेरे यांचा गौरव केला. नव्या पिढीसाठी साहित्य डिजिटल स्वरूपात नेण्याचे आव्हान आपल्याला पेलायचे आहे, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button