breaking-newsपिंपरी / चिंचवड

निरामय हॉस्पीटल महापालिकेचे जावई आहे का ? – इरफान सय्यद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य शासनाने पिंपरी चिंचवडसह राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरु असताना खासगी रुग्णालयांनी शासकीय व पालिका रुग्णालयाप्रमाणे आपले कर्तव्य लक्षात घेत रुग्णसेवा देणे बंधनकारक आहे. मात्र, कोरोना संशयीत रुग्णांवर खासगी रुग्णालयाने उपचार नाकारणे हा प्रकार योग्य नाही. शहरातील जवळपास सर्वच रुग्णालये कोरोनाबाधितांना उपचार देत असताना चिंचवडमधील निरामय हॉस्पिटल आपली जबाबदारी टाळत असल्याचा प्रकार शहरात घडत आहे.

निरामय हाॅस्पिटलने कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून दिलेले नाहीत. सर्व रुग्णालयांची माहिती पालिकेच्या डॅशबोर्डवर उपलब्ध असताना या रुग्णालयाचे साधे नावही या डॅशबोर्डवर दिसत नाही. हा प्रकार महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देखील या रुग्णालयावर कारवाई करण्यास महापालिका आयुक्त हर्डीकरांचे हात धजावत नाहीत. त्यामुळे चिंचवडचे हे निरामय हॉस्पिटल पालिका आयुक्तांचे जावई तर नाहीत ना ? असा सवाल कामगार नेते इरफान सय्यद यांनी उपस्थित केला आहे.

प्रसिद्धीपत्रकात इरफान सय्यद यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासकीय व महापालिकेच्या रुग्णालयासोबतच काही खासगी रुग्णालये देखील चांगली कामगीरी बजावत आहे. तसेच या आजाराची लक्षणे लक्षात घेवुन जबाबदारीचे भान राखत त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्याचे काम सुरु आहे. परंतु, चिंचवड स्टेशन येथील निरामय हॉस्पिटल हे खासगी रुग्णालय स्टाफ व बेड शिल्लक नाही, डॉक्टर उपलब्ध नाही, अशी कारणे सांगून कोरोना रुग्णांना उपचारास नकार देत आहे. या रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करावी. वेळप्रसंगी या रुग्णालयाचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी मी काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र, यावर आयुक्त व प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे.

पालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या विरोधात तक्रारींचा भडीमार केला. बिलाची आकारणी जादा केली जात आहे. त्यांच्या बिलांची तपासणी करण्यात यावी. रुग्णांची हेळसांड केली जाते, असे विविध आरोप रुग्णालय प्रशासनावर केले. त्यावर महापौर उषा ढोरे यांनी चिंचवडच्या आदित्य बिर्ला रूग्णालयांसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या रूग्णालयावर कारवाई करावी, असे आदेश आयुक्तांना दिले. परंतु, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सर्वप्रथम आदित्य बिर्ला रुग्णालयाने बेड उपलब्ध करून दिले. आजच्या घडीला १४० बेड तेथे उपलब्ध असून कोराना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

शहरातील ठराविक रुग्णालयांची नावे आणि बेडसंख्या पुढीलप्रमाणे :-

संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल :- ४० बेड्स
आदित्य बिर्ला हॉस्पिटल, चिंचवड :- १०० बेड्स
आयुष्य हॉस्पिटल :- २६ बेड्स
आयुश्री हॉस्पिटल :- २६ बेड्स
सिटी केअर हॉस्पिटल, पिंपरी :- ४८ बेड्स
डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी :- ३०० बेड्स
देसाई हॉस्पिटल, भोसरी :- ८२ बेड्स
ग्लोबल हॉस्पिटल, वाकड :- ३१ बेड्स
गोल्डन केअर हॉस्पिटल, वाकड :- ४८ बेड्स

याशिवाय शहरात इतर ठिकाणीही बेड्स राखीव असल्याचे पालिकेच्या डॅशबोर्डवर दिसते, मात्र, निरामय हॉस्पिटलचे नाव पालिकेच्या डॅशबोर्डवर दिसत नाही. त्यामुळे निरामय हाॅस्पिटल हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे की आयुक्तांचे जावई आहेत का? शासनापेक्षा निरामय हाॅस्पिटल मोठे आहे का? याचे उत्तर सर्वप्रथम आयुक्तांनी जनतेला द्यावे. आयुक्तांनी पारदर्शक कारभार करून चिंचवडच्या निरामय रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी उपचाराची सोय करून द्यावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून आम्ही आमचा न्याय हक्क मिळवून घेऊ, असे या पत्रकात इरफान सय्यद यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button