breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

नितीन गडकरींची तरतुद अन्‌ कोल्हे, लांडगे, आढळराव पाटलांमध्ये चढाओढ!

पुणे- नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणासाठी तब्बल ६५० कोटींचा निधी

गडकरींच्या आभारासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेनाही धावली

पुणे । विशेष प्रतिनिधी

पुणे- नाशिक महामार्गावरील प्रवास सुखकर व्हावा. वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता व्हावी. या उद्देशाने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे- पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील प्रवाशांना ‘विंटर गिफ्ट’ दिले. या रस्त्याच्या कामासाठी तब्बल ६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मात्र, या कामाचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी शिरुरचे खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यात चुरस लागली आहे. अमोल कोल्हे यांच्या विनंतीबाबत केंद्रीय मंत्रालयाने ‘विद्यमान खासदार’ या नात्याने अमोल कोल्हे यांच्या पत्राला उत्तर दिले. त्याचा आधार घेत कोल्हे यांनी सोशल मीडियावर नितीन गडकरी यांचे जाहीरपणे आभार मानले.

दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही २०१३ पासून पुणे –नाशिक महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी केलेल्या लेखी पाठपुराव्‍याचे दाखले सोशल मीडियावर दिले आहेत.

***

खासदार कोल्हेंना आढळरावांचा टोला…

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे की, पुणे नाशिक महामार्गावरील खेड टोल नाका ते नाशिक फाटा हा रस्ता सध्या चार पदरी जरी असला तरी या रस्त्यावर भविष्यात होणारी ट्रॅफिक लक्षात घेऊनच त्यावेळी कुणाचीही आग्रही मागणी नसताना देखील मी सन२०१३ पासून तत्कालीन केंद्रीय दळणवळण मंत्री मा.सी.पी.जोशी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. मोठमोठे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी केवळ एक-दोन भेटी पुरेशा नसून प्रकल्पातील प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा करून काम करून घेणे आवश्यक असते. त्याचमुळे केवळ मंत्री महोदयांकडे पत्र देऊन मी शांत बसलो नाही तर त्या विभागाचे चेअरमन, सचिव, मुख्य अभियंता, डीपीआर बनवणारी सल्लागार कंपनी जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी आदींबरोबर वेळोवेळी कितीतरी बैठका घेऊन सातत्याने पत्रव्यवहार करून योजनेतील अडचणी अभ्यासपूर्ण पद्धतीने मार्गी लावण्यासाठी मेहनत घेतली. शेवटी या सर्वांची परिपूर्ती मोठे प्रकल्प मंजूर होण्यात होत असते, असे भाष्य करीत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे.

***

भाजपा आमदार महेश लांडगेंकडूनही गडकरींचे आभार…

दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनीही पुणे-नाशिक महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. भाजपाप्रणित केंद्र सरकारचे मंत्री म्हणून आमदार लांडगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. तसेच, प्रकल्पाची वैशिष्ठे आणि पिंपरी-चिंचवडला होणारा फायदा याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button