breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपूल वाहतूकीसाठी खूला करा

पिंपरी |महाईन्यूज|

पुणे-मुंबई महामार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेने उड्डाणपूल उभारला आहे. तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी करीत निगडी, यमुनानगर, प्राधिकरण व ओटास्कीम परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन केले.

महामार्गावरील प्राधिकरण पोलिस चौकीसमोर उड्डाणपुलालगत झालेल्या आंदोलनाचे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन काळभोर, सचिन शिंदे, स्वप्नील पवार, अक्षय सावंत यांनी नेतृत्व केले. राम ताटे, भरत पवार, गोकुळ सातपुते, पिट्टू लोंढे, विकास कांबळे आदी सहभागी झाले होते.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गेल्या अडीच वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी वाहतूक वळविण्यात आली असून, पाचशे मीटर अंतरासाठी सुमारे दोन-अडीच किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. याचा स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनाही त्रास होत आहे. शिवाय, पुलाच्या कामामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील सेवा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवून डांबरीकरण करावे व उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करावा.

उड्डाणपुलाच्या कामामुळे महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. निगडीकडून देहूरोडकडे जाण्यासाठी रावेत बीआरटी रस्त्याने प्राधिकरण सेक्‍टर 23 पर्यंत जाऊन यु-टर्न घ्यावा लागत आहे. तेथून ट्रान्स्पोर्ट नगरमधून पीएमपीच्या निगडी डेपोमार्गे महामार्गावर यावे लागत आहे. हे अंतर सुमारे दोन किलोमीटरपेक्षा अधिक आहे. तसेच, देहूरोडकडून निगडी टिळक चौकात येण्यासाठी स्पाइन रस्त्यावर अंकुश चौक, त्रिवेणीनगर चौक, दुर्गा चौक मार्गे यमुनानगरमधून टिळक चौकात यावे लागत आहे. हे अंतर अडीच किलोमीटरपेक्षा अधिक आहे.

याशिवाय, टेल्को रस्ता व स्पाइन रस्त्याने येणाऱ्या वाहनांचीही यात भर पडत असल्याने दुर्गा चौकपासून टिळक चौकापर्यंत आणि त्रिवेणीनगर चौकात वाहतूक कोंडी होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन यमुनानगरची कोंडीतून सुटका होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button