breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थकांचा आनंदोत्सव

नाशिक – राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याचे समजताच समता परिषदेचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकसह भुजबळांच्या येवला विधानसभा मतदारसंघात समर्थकांनी फटाके फोडून, पेढे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही स्वतंत्रपणे जल्लोष करत निर्णयाचे स्वागत केले.

मार्च २०१६ मध्ये बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात समीर भुजबळ यांच्यापाठोपाठ छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. त्यानंतर गेली दोन वर्षे ते तुरुंगात होते. तेव्हापासून त्यांच्या जामिनासाठी त्यांच्या समर्थकांनी खूप प्रयत्न केले होते.

अखेर शुक्रवारी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. जामीन मंजूर झाल्याचे समजल्यानंतर समता परिषदेचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते भुजबळ फार्मवर जमा झाले. या निर्णयाचे पेढे वाटून स्वागत करण्यात आले. फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उत्साही कार्यकर्ते भुजबळ फार्मच्या आवारात ढोल-ताशे नसताना नाचताना दिसले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी राष्ट्रवादी भवनसमोर समांतरपणे आनंदोत्सव साजरा करीत होते. फटाके फोडून भुजबळांच्या सुटकेचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी भवन आणि भुजबळ फार्म यामध्ये फारसे अंतर नाही. दोन्ही ठिकाणी स्वतंत्रपणे फटाके फोडणारे कार्यकर्ते परस्परांकडे फारसे फिरकले नाहीत.

नाशिक हा कधी काळी भुजबळ यांचा बालेकिल्ला होता. भुजबळ यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय समता परिषदेचे हे मुख्यालय. स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीची सूत्रे भुजबळ यांच्याकडे होती. राष्ट्रवादीच्या संघटनात्मक पदांवर समता परिषदेचे पदाधिकारी आधिक्याने असायचे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्यावर हे चित्र बदलू लागले.

भुजबळ यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीत अनेक फेरबदल झाले. भुजबळांच्या सुटकेसाठी प्रारंभी राष्ट्रवादी आणि समता परिषद एकत्रितपणे रस्त्यावर उतरली होती. कालांतराने राष्ट्रवादीने न्यायालयावर विश्वास असल्याचे सांगून भुजबळांचा विषय काहिसा बाजूला ठेवला. मात्र समता परिषद अर्थात भुजबळ समर्थकांनी आपला लढा पुढे कायम ठेवला. भुजबळांच्या सुटकेसाठी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली.

त्या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी अभावाने दिसायचे. राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली संघर्ष यात्रा असो किंवा इतर काही पक्षीय कार्यक्रम असो, भुजबळांचे छायाचित्र किंवा नाव वगळल्यावरून समर्थकांनी अनेकदा रोष प्रगट केला. राष्ट्रवादीवर अनेकदा सारवासारव करण्याची वेळ आली. जल्लोष साजरा करतानाही राष्ट्रवादी आणि समता परिषदेतील मतभेद दिसले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button