breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नामविस्तारचा लढा हा अस्मितेचा लढा – राहुल प्रधान

पिंपरीत ‘पॅन्थर- एक क्रांतीचा लढा’ या विषयावर विचार प्रबोधन पर्व

पिंपरी | प्रतिनिधी

नामविस्तारचा लढा हा फक्त नावासाठी न्हवता तर अस्मितेचा लढा होता. या लढ्यामुळे एक इतिहास रचला गेला. नामांतराचा लढा हा नामविस्तारावर स्थिरावला, पण इथून पुढील संघर्ष हा शेवटचा न्याय मिळण्यासाठी असेल. या करिता युवकांनी सज्ज झाले पाहिजे. कोणताही लढा हा शेवटचा नसतो. आंबेडकरी समाजाला संघर्षांशिवाय सहज काहीही मिळत नाही. म्हणून आपल्याला लढा चालूच ठेवावा लागेल, असे प्रतिपादन पॅन्थर राहुल प्रधान यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आम्ही भारतीय पिंपरी चिंचवड शहर संघटनेच्या वतीने आज पिंपरी मधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे ‘पॅन्थर- एक क्रांतीचा लढा’ या विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. पॅन्थर राहुल प्रधान (नांदेड) यांनी ‘पॅन्थर लढा आणि आंबेडकरी चळवळ’ या विषयावर आपले विचार मांडले तर सर्वजीत बनसोडे यांनी ‘आंबेडकरी चळवळीची वाटचाल’ या विषयावर मार्गदर्शन केले.

आंबेडकरी चळवळीतील पॅन्थरचा लढा हा अस्मितेचा हुंकार होता. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यातून अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढणारी संघर्षशील पिढी निर्माण झाली. या पिढीने स्वाभिमानाची ज्योत प्रत्येक पिडीत शोषितांच्या मनामध्ये चेतवली. हा संघर्षाचा इतिहास नवोदित पिढीसाठी सतत मार्गदर्शक आणि प्रेरक राहील असा सूर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या आयोजित कार्यक्रमामधून निघाला.

सर्वजीत बनसोडे म्हणाले की, आंबेडकरी चळवळ ही युवकांच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील शोषित, वंचित पिढीतांच्या न्याय, हक्क, समता मिळवण्याची जबाबदारी आहे. आंबेडकरी चळवळ स्वाभिमान बाळगून संघर्ष करणारी विचारधारा आहे. समाज घटकातील प्रत्येकाने बाबासाहेब आंबडेकर यांचे स्वलिखित पुस्तके वाचून न्यायाचा लढा अविरत सुरु ठेवला पाहिजे. तरच समाजाची सुरक्षा आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून होईल.

प्रारंभी, पिंपरीतील संत तुकाराम नगर मधील पंचशील विहारापासून क्रांतीची मशाल ज्योत प्रज्वलित करून आचार्य अत्रे रंगमंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर या सभागृहात प्रमुख कार्यक्रमास सुरुवात झाली. पॅन्थर लढ्यातील छायाचित्रे तसेच मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील महत्वाची क्षणचित्रे चित्रफितीद्वारे प्रोजेक्टरवर दाखवण्यात आली. यानंतर शाहिर चरण जाधव यांच्या आंबेडकरी शाहिरी जलश्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी ‘जळतोय मराठवाडा’ या गीतातून नामविस्ताराचा लढा उपस्थितांच्या समोर उभा केला. पॅन्थर नामदेव ढसाळ यांच्या विद्रोही कवितांच्या माध्यमातून समाज वास्तव  केले. तर रमाबाई नगर हत्याकांडातील संघर्ष शाहिरीच्या माध्यमातून सर्वांपुढे मांडला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक विनोद गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन राहुल सोनवणे आणि आभार धम्मराज साळवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता धम्मराज साळवे, विनोद गायकवाड, राहुल सोनवणे, विशाल गायकवाड, मिलिंद घोगरे, राजू वारभुवन, स्वप्नील कांबळे, विजय ओव्हाळ, दिनकर ओव्हाळ, संतोष शिंदे, प्रमोद क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button