breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाणारमधील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पावरून संघर्षाचा भडका

मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेनेत अनेक मुद्द्यांवरून खणाखणी होत असतानाच, नाणारमधील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पावरून संघर्षाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाला कडाडून विरोध असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना घेऊन नाणार गाठले. उद्योगमंत्र्यांनी तेथे ‘नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द’ अशी घोषणा केली. त्यानंतर उद्धव यांनी, ‘नाणार प्रकल्प विदर्भ किंवा गुजरातमध्ये न्या’, असा टोलाही भाजपला लगावला. मात्र, हे शब्द हवेत विरतात तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही. सुभाष देसाई यांना तसा कोणताही अधिकारच नाही’, असे सांगत शिवसेनेच्या शिडातील हवाच काढून घेतली. शिवसेनेच्या निर्णयाला प्रथमच मुख्यमंत्र्यांनी असा थेट विरोध केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या दोन्ही पक्षांतील शीतयुद्धाने टोक गाठल्याचे दिसून येत आहे.
कोण काय म्हणाले?
‘शेतकरी-मच्छिमार उद्‌ध्वस्त होत असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थाचा विरोध कायद्याने मानलाच पाहिजे. स्थानिक जनतेच्या संमतीखेरीज सरकारला भूसंपादन करता येत नाही. तसे यापूर्वी युती सरकारच्या काळात केंद्र सरकारला हमीपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प होऊ शकत नाही’
-उद्योगमंत्री सुभाष देसाई
‘नाणारमध्ये गुजरातींनी जागा विकत घेतल्या आहेत. त्यांचा पैसा वाया जाईल, त्यांना मोबदला मिळणार नाही म्हणून नाणार प्रकल्प कोकणात लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोकणच्या पवित्र भूमीत हा प्रकल्प होऊ देणार नाही. ज्यांना नाणार प्रकल्प हवा आहे, त्यांनी तो विदर्भ किंवा गुजरातमध्ये घेऊन जावा’
-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
‘नाणार प्रकल्पाबाबतची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार उद्योगमंत्र्यांना नाही. हा अधिकार उच्चाधिकार समितीला आहे. अधिसूचना रद्द करण्याचे मत हे सरकारचे नसून ते सुभाष देसाई यांचे व्यक्तिगत मत आहे. कोकण आणि राज्याचे हित लक्षात घेऊनच नाणार प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येईल’
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अशी पडली ठिणगी…
-नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा सुरुवातीपासूनच विरोध असून, उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेटही घेतली होती.
-स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय हा प्रकल्प होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिले होते.
-मात्र, त्यानंतरही केंद्र सरकारने या प्रकल्पासंदर्भात सौदी अरेबिया येथील एका कंपनीसोबत सामंजस्य करार केला.
-त्यामुळे शिवसेनेने केंद्र तसेच राज्य सरकारला नाणार मुद्द्यावरून लक्ष्य केले होते.
– त्याचाच पुढील भाग म्हणून नाणारवासीयांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रत्नागिरी गाठले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button