breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करणा-या निष्क्रीय आयुक्तांची बदली करावी – सचिन साठे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्यामध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या महाविकास आघाडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नागरिकांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडवावा. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. टँकर लॉबीला पोसण्यासाठी आयुक्तांनी नागरिकांवर दिवसाआड पाणी कपात लादली आहे. ‘धरण घशाला, कोरड उशाला’ अशी शहरातील करदात्या नागरिकांची अवस्था झाली आहे. सत्ताधा-यांचे आयुक्तांवर नियंत्रण नाही आणि आयुक्तांचा प्रशासनावर अंकुश नाही. नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणा-या आणि निष्क़्रीय प्रशासनाला पाठीशी घालणा-या आयुक्त श्रावण हर्डीकर यांची ताबडतोब बदली करावी व या विषयाशी संबंधित जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

सोमवारी (दि. 2 डिसेंबर) कॉंग्रेसच्या वतीने पाणी कपातीच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर हैद्राबाद येथे सामूहिक अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या डॉक्टर तरुणीस व रविवारी रात्री दापोडी येथे ड्रेनेजचे काम करीत असताना मृत्यू झालेल्या अग्नीशामक दलाचे जवान विशाल जाधव आणि मजूर नादप्पा जमादार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून अहिल्याबाई होळकर चौकात महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर आला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी साठे यांनी केलेल्या मागणीनुसार पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यास आले होते.

यावेळी प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, तुकाराम भोंडवे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, बिंदू तिवारी, शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, प्रियदर्शनी सेलच्या अध्यक्षा विनिता तिवारी, आशा शहाणे, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नेते मेहताब इनामदार आदी उपस्थित होते.

टॅंकरचे बील सोसायट्यांच्या माथी न मारता ते पालिकेने भरावे

सचिन साठे म्हणाले की, पाणीगळती व पाणीचोरी रोखण्यास मनपा प्रशासनाला पूर्णत: अपयश आले आहे. शहरातील नागरिक वेळोवेळी पाणीपट्टीसह सर्व कर महापालिकेच्या तिजोरीत भरतात. मिळकत कर व पाणीपट्टी कर थकवणा-या नागरिकांवर जप्तीच्या नोटीसा बजावल्या जातात. सेवा न देता दडपशाही करणा-या अधिका-यांवर कारवाई झाली पाहिजे. नागरिकांना प्राथमिक सेवा, सुविधा देणे ही महापालिका प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांना पाणी देण्याऐवजी टँकर लॉबी पोसण्याचा उद्योग प्रशासन करीत आहे. ज्या सोसायट्यांना खासगी टँकरव्दारे पाणी घ्यावे लागते. त्यांना महापालिकेने टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा. या टँकरचे बील सोसायट्यांच्या माथी मारण्याऐवजी महापालिकेने भरावे. नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणा-या आणि निष्क़्रीय प्रशासनाला पाठीशी घालणा-या आयुक्त श्रावण हर्डीकर यांची ताबडतोब बदली करावी व या विषयाशी संबंधित जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी साठे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button