breaking-newsआंतरराष्टीय

नवाज शरीफ यांच्या जावयाला अटक

झरदारी यांना परदेशी जाण्यास बंदी

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या जावयाला आज अटक करण्यात आली. तर माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांना परदेशी जाण्यास बंदी करण्यात आली. एकाच दिवशी बड्या नेत्यांशी संबंधित या भिन्न घडामोडी घडल्याने पाकिस्तानचे राजकीय क्षेत्र हादरले.

शरीफ, त्यांच्या कन्या मरियम आणि जावई मुहम्मद सफदर यांना अलीकडेच पाकिस्तानमधील न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवून तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. सफदर यांना तपासात सहकार्य न केल्याबद्दल एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा लागू शकला नव्हता. मात्र, रावळपिंडीतील समर्थकांच्या रॅलीत ते नाट्यमयरित्या सहभागी झाले. तिथेच त्यांना नॅशनल अकाऊंटॅबिलिटी ब्युरोच्या (एनएबी) पथकाने अटक केली. पाकिस्तानात 25 जुलैला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

सफदर त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. मात्र, शिक्षा ठोठावण्यात आल्याने ते आणि मरियम आता निवडणूक लढवू शकत नाहीत. तर शरीफ यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने याआधीच निवडणूक लढवण्यास आजन्म अपात्र ठरवले आहे. दरम्यान, शरीफ यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या विरोधी पक्षाचे नेते झरदारी हेही अडचणीत आले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना परदेशी जाण्यास मज्जाव केला. पाकिस्तानात बनावट बॅंक खात्यांचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणात सामील असल्याच्या आरोपावरून झरदारी यांचा समावेश पाकिस्तान सोडून जाण्यास मनाई करण्यात आलेल्यांच्या यादीत टाकण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button