breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नववी पास खासदार बारणेंना संसदरत्न मिळणे ही शोकांतिका – प्रमोद इंदुराव

  • खासदार बारणेंना नीट हिंदी बोलता येत नाही
  • उच्चशिक्षीत पार्थ पवारांची बरोबरी काय करणार?

कर्जत, (महा-ई-न्यूज) – संसदेत प्रश्न मांडले म्हणून सलग पाच वर्षे संसदरत्न मिळाला म्हणून गवगवा करणारे खासदार श्रीरंग बारणे हे इयत्ता नववी पास आहेत. त्यांना नीट हिंदी बोलता येत नाही. संसदेत प्रश्न मांडण्यासाठी हिंदीबरोबरच इंग्रजीवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. बारणेंना हिंदी बोलता येत नाही. ते शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न संसदेत कसे मांडणार, असा प्रश्न आहे. त्यांना संसदरत्न मिळणे ही मोठी शोकांतिका आहे, अशा शब्दांत सीडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद इंदुराव यांनी खासदार बारणे यांच्यावर सडकून टिका केली.

मावळ लोकसभा मतदार संघात कर्जत तालुक्यातील उमरोली येथे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश लाड़, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद इंदुराव, राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील, शेकापचे तालुका चिटणीस प्रविण पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अरविंद पाटील, विकास बडेकर, कर्जत नगरपरिषदतचे माजी अध्यक्ष राजेश लाड आदी यावेळी उपस्थित होते.

इंदुराव म्हणाले की, औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला. तेव्हा याच शिवसेनेने विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यास विरोध केला होता. नामकरण झाले तर तुमचे मुख्यमंत्री पद जाईल, अशा धमक्या याच पक्षाच्या नेत्यांनी दिल्या होत्या. परंतु, पवार साहेबांनी मुख्यमंत्री पद हातून गेले तरी बेहत्तर पण विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठाम निर्णय घेतला. आता याच शिवसेनेचा उमेदवार श्रीरंग बारणे तुमच्यावर लादला आहे. गेल्या पाच वर्षात या खासदाराने एकही प्रश्न सोडविला नाही.

पार्थ पवारच आपले प्रश्न सोडवतील

बारणे हा नववी पास खासदार नागरिकांचे प्रश्न कसे सोडविणार?, संसदेत नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी हिंदी बरोबरच इंग्रजीवर प्रभुत्व गरजेचे असते. बारणेंना संसदरत्न कसा मिळाला, याबाबत साशंकता आहे. पार्थ पवार हे उच्चशिक्षीत उमेदवार आहेत. त्यांचे हिंदीबरोबरच इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व आहे. ते आपल्याला भेडसावणारे सर्व प्रश्न संसदेत ठामपणे मांडतील. त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करून ते सोडविण्याचा प्रयत्न देखील करतील, असा विश्वास इंदुराव यांनी व्यक्त केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button