breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

नगरसेवकांनो, प्रसिध्दीपासून चार हात लांब रहा, भाजप आमदारांचा सज्जड दम

‘सोन्याची कोंबडी’ हातातून निसटण्याची भिती; पक्षविरोधी भूमिका घेणा-यांच्या पदावर यापुढे सक्रांत

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून भाजपने सत्ता मिळविली. सत्ताधारी भाजपने गेल्या अडीच वर्षात पाणी, कच-यासह मुलभूत सोयी-सुविधा पुरवण्यास देखील अपयशी ठरले आहेत. यामुळे नागरिकांच्या समस्या घेवून स्वपक्षीय नगरसेवकांनी पक्षविरोधी भूमिका घेवून विविध आंदोलन केली. त्याच्याच फटका विधानसभा निवडणुकीत मताधिक्य घटून भाजप आमदारांना बसला. त्यामुळे भाजप आमदारांनी पालिकेत नगरसेवकांची बैठक घेवून प्रसिध्दीपासून चार हात लांब रहाण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच पक्षाविरोधी माध्यमात काहीच बोलायचे नाही, कोणतीही प्रेस नोट काढायची नाही, असा सज्जड दम भाजप आमदारांनी दिला आहे. दरम्यान, निवडणुकीत आणि यापुढे पक्षविरोधी भूमिका घेणा-यांची पदे काढून घेण्यात येतील, असा इशारा देखील दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत आज (गुरुवार) भाजप नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी भाजपचे चिंचवड आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, महापाैर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्यासह सर्व समित्याचे सभापती, प्रभाग अध्यक्ष आणि नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

सलग पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची उलथवून भाजपने सत्ता मिळविली आहे. महापालिकेवर सत्तेत येवून अडीच वर्ष लोटली आहेत. सत्तेत आल्यानंतर एक वर्ष सर्व कारभार सुरळीत चालला होता. मात्र, त्यानंतर पाणी प्रश्न, कचरा समस्या, रस्ते साफसफाई, विविध कामांमधील अनागोंदी कारभार, रस्ते खोदाई, अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, स्मार्ट सिटी योजनेची कामे यासह आदी प्रश्नावरुन भाजपमधील नगरसेवकांनी पक्षविरोधी भूमिका घेतली. सतत प्रसिध्दीपत्रके काढून पक्षाला बदनाम केले. लोकांच्या प्रश्नावरुन पक्षाच्या विरोधी कामकाज केले. त्यामुळेच पक्ष विरोधी लोकांचा रोष वाढून निवडणुकीत त्याचा फटका विद्यमान भाजप उमेदवारांना बसला. अनेकांनी विधानसभा निवडणुकीत कामे केल्याने मताधिक्य देखील घटले. यावरुन नगरसेवकांची चांगलीच कानउघडणी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली.

तसेच यापुढे सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील कामे, समस्या, अडीअडचणी माध्यमातून न मांडता, त्या आमच्याकडे अथवा महापालिकेचे महापाैर, सत्तारुढ पक्षनेते यांच्याकडे मांडाव्यात. त्यात कोणीही माध्यमांकडे प्रेस नोट देवू नये, पक्षाची स्वयंशिस्त देखील पाळावी, सर्वांनी जनतेत मिसळून त्याची कामे करावी, दोन वर्षांनी पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पक्षाविरोधी असलेला रोष कमी करण्यासाठी जनतेत मिसळून कामे करा, अशा सुचनाही आमदार जगताप यांनी दिल्या आहे.

‘सोन्याची कोंबडी हातातून निसटण्याची भिती’…

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काॅग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्रित येवून महाशिवआघाडी माध्यमातून सत्ता स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. यामुळे भाजप आमदारांनी नगरसेवकांची बैठक घेवून सर्वांनी पक्षविरोधी काम न करण्याच्या सक्त सुचना दिलेल्या आहे. राज्यातील सत्ता बदलानंतर मुळचे काॅंग्रेस-राष्ट्र्वादीचे असलेले नगरसेवक पुन्हा महाआघाडीत येवू शकतात. त्याचा एक गट महाशिवआघाडीत सामील होण्याची दाट शक्यता आहे. त्यावरुन महापालिकेत सत्तांतर घडू शकते. तसेच महापालिका ही सोन्याची कोंबडी असून ती भाजपच्या हातातून निसटू शकते. याच पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांची आमदारांनी कानउघडणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button