पिंपरी / चिंचवड

धनगर समाजाला लवकरच आरक्षण मिळेल – डॉ. विकास महात्‍मे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने देशभरातील ओबीसींना घटनात्‍मक अधिकार मिळवून दिले आहेत. यामुळे ओबीसी समाजातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच धनगर समाजालाही लवकरच आरक्षण मिळेल, असा विश्वास राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्‍मे यांनी आज (गुरुवारी)  चिंचवड येथे व्यक्‍त केला.

पिंपरी: भाजपने खासदारांसाठी 6 ते 14 एप्रिल या कालावधीत केंद्रीय संसद प्रवास योजना सप्‍ताह आयोजित केला आहे. त्यानिमित्त डॉ. महात्‍मे यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहराला भेट दिली. त्‍यावेळी आयोजित केलेल्‍या पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी महापौर नितीन काळजे, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भाजप प्रदेश सचिव उमा खापरे, भाजप प्रदेश सदस्य सदाशिव खाडे,  पक्षनेते एकनाथ पवार, भाजप शहर चिटणीस बाबू नायर, प्रमोद निसळ आदी उपस्थित होते.

डॉ. महात्‍मे पुढे म्‍हणाले की, भाजपचा 6 एप्रिल हा स्थापना दिवस आहे. याचे निमित्त साधून भाजपने केंद्रीय संसद प्रवास योजना सप्‍ताह आयोजित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने नागरिकांसाठी ज्या विविध कल्‍याणकारी योजना सुरू केल्‍या आहेत. त्‍याची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी, त्‍यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, भाजपच्या विविध सेलशी संपर्क साधून त्‍यांचे प्रबोधन खासदारांनी करावे, असा उद्देश आहे.

डॉ. महात्‍मे यांनी आपल्‍या भेटीत संघ कार्यालय, भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक, वरिष्ठ पदाधिका-यांशी संवाद साधून पुढील कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. युवा मोर्चाच्या बैठकीत डिजिटल इंडिया अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील 25 हजार नागरिकांपर्यंत ‘भीम’ अॅप पोहचविण्याचा संकल्‍प यावेळी करण्यात आला.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. केंद्र आणि राज्‍यातील भाजप सरकारने याबाबत सकारात्‍मक पाऊल उचलले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धनगर आरक्षणाची मागणी पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्‍त केला जात होता. परंतु, धनगर आरक्षण विधेयक काही आले नाही. याविषयी अधिक माहिती देताना खा. डॉ. महात्‍मे म्‍हणाले की, मी राज्‍यसभेत आवाज उठवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली. तसेच 11 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली.

टाटा कंपनीला धनगर आरक्षणाबाबत माहिती गोळा करण्यास काही कालावधी लागणार असल्यामुळे 15 नोव्हेंबरपर्यंत संशोधन पूर्ण होऊन लवकरच धनगर समाजाला आरक्षण मिळेल, असा विश्वास डॉ. महात्‍मे यांनी व्यक्‍त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button