breaking-newsमहाराष्ट्र

धनगर आरक्षणावरून चौंडीत दगडफेक

  • घोषणापत्रके भिरकावली

  • दगडफेकीत पोलीस गंभीर जखमी

जामखेड- पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे व बारामती येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी धनगर आरक्षणाच्या घोषणा देऊन पत्रके भिरकावल्याने एकच गोंधळ उडाला, पळापळ सुरू झाली. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. कार्यकर्त्यांना पकडून पोलीस गाडीत बसवले जात असताना एका कार्यकर्त्याने दगड मारला. त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी संदीप कचरू पवार गंभीर जखमी झाले. त्यांना जामखेडमधील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या डोक्‍याला मार लागला आहे. गोंधळ घालणाऱ्या 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, दगडफेकीबरोबरच खुर्च्यांची देखील फेकाफेक यावेळी करण्यात आली.तसेच चौंडीमधील दगडफेकीच्या घटनेचा पडसाद जामखेड शहरात उमटले. शहरात काही भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. पुण्यश्‍लोक अहल्यादेवींच्या 293 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित कार्यक्रमाला लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन उपस्थित होत्या. जयंतीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ना. शिंदेंनी भाषणाला सुरुवात करून आरक्षणाचा प्रश्‍न संसदेत सुटणार आहे, तेथे अध्यक्ष सुमित्रा महाजन आपणाला मदत करतील. शिवाय, सोलापूर विद्यापीठाला अहल्यादेवींचे नाव दिले आहे, त्याला न्यायालयाची स्थगिती आहे.

मात्र, नाव घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असे ना. शिंदे म्हणताच जिल्हाबंदी केलेले बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी सभामंडपाच्या समोरील बाजूने उभे राहून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या घोषणा देऊन पत्रके भिरकावली. थोड्या वेळाने दुसरा गट आक्रमक झाला. त्यानेही घोषणाबाजी केली. कार्यक्रम उधळला जाऊ नये म्हणून पोलीस मंडपात घुसले. पोलिसांनी डॉ. भिसे व बारामती येथील राष्ट्रवादीचे मासाळ या कार्यकर्त्यांना उचलून सभामंडपाच्या बाहेर नेले. पोलीस गाडीत बसवत असताना अचानक एक दगड पोलिसांच्या दिशेने आला. त्यात संदीप पवार यांच्या डोक्‍याला दगड लागल्याने ते जखमी झाले. त्यामुळे ना. शिंदेंना भाषण आटोपते घ्यावे लागले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. स्वत: सुमित्रा महाजन यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले; मात्र गोंधळ सुरूच होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button