breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

दोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री?

पोलीस शस्त्रपुरवठादार, ग्राहकांच्या शोधात

विनापरवाना प्राणघातक शस्त्रांचा साठा व विक्री करत असल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला डोंबिवलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपचा कार्यकर्ता धनंजय कुलकर्णी हा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या शस्त्रांची विक्री करत होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. या उद्योगासाठी त्याला कुणाचे पाठबळ होते, त्याला शस्त्रे कोण पुरवीत होते तसेच त्याने शस्त्रांची कोणाला विक्री केली, याचा पोलीस शोध घेत आहेत.

धनंजय कुलकर्णी याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. त्याच्या शोभेच्या वस्तूच्या दुकानांत सापडलेली शस्त्रे शोभेची असल्याचे त्याच्या समर्थकांकडून सांगण्यात येत होते. मात्र, ही सर्व प्राणघातक शस्त्रे आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.  कल्याण सत्र न्यायालयाने धनंजयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

यासंदर्भात अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर तसेच पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. दरम्यान, धनंजय हा बोलण्यात फटकळ असल्यामुळे त्याचे अनेकांशी मतभेद होते, अशी माहिती डोंबिवलीतील काही भाजप कार्यकर्त्यांनी दिली. निवडणुकीत भाजपच्या काही उमेदवारांविरोधात तो छुपेपणाने काम करायचा, असेही त्यांनी सांगितले.

डोंबिवली: धनंजय कुलकर्णीला तपासासाठी ताब्यात देण्यासाठी गुन्हे शाखेने गुरुवारी वरिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल केला. धनंजयला न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आला नाही, असे पोलीस सूत्राने सांगितले. यापक्ररणाचा अधिक तपास करणे आवश्यक असल्याने गुन्हे शाखेने गुरुवारी धनंजयला पोलीस तपासासाठी ताब्यात देण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर वरिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी दिली.

सुशिक्षित, सुसंस्कृत शहर म्हणून डोंबिवली ओळखली जाते. या शहरातील भाजपच्या एका कार्यकर्त्यांकडे अचंबित करणारा शस्त्रसाठा सापडतो हे निषेधार्ह आहे. ज्यांनी शहरवासीयांचे संरक्षण करायचे, आधार द्यायचा, तेच आता शस्त्र विकण्याचा व्यवसाय करीत असतील तर सामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा?    – गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्त्यांजवळ शस्त्रसाठा सापडल्याने, भाजपचे बोलायचे आणि खायचे दात कसे वेगळे आहेत हेच या माध्यमातून दिसून येते. एकीकडे धर्मनिरपेक्ष, सोज्वळतेच्या गप्पा मारायच्या आणि पडद्यामागून आपले मूळ धंदे सुरू ठेवायचे हीच भाजपची मानसिकता या प्रकारातून उघड झाली. या प्रकरणाची गुन्हे शाखेबरोबर दहशतवादी पथकाने चौकशी सुरू करावी. वातावरण खराब करण्याचे काम भाजपकडून कसे सुरू आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धनंजय कुलकर्णी आहे.   – महेश तपासे, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस

धनंजय कुलकर्णी हे दुकानात शस्त्र ठेवून त्याची विक्री करीत होते. फक्त प्रमाणापेक्षा अधिक साठा त्यांनी ठेवला. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. आता पोलीस तपासात वस्तुस्थिती पुढे येईल. फार मोठा दहशतवादी शहरात पकडलाय अशा प्रकारचे जे वातावरण सध्या रंगवले जात आहे. ते योग्य नाही.  – नरेंद्र पवार, आमदार, भाजप

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button