breaking-newsआंतरराष्टीय

दोन्ही कोरिया आणि जागतिक शांतता

दिनांक 27 एप्रिल 2018 हा दिवस जागतिक शांततेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. यादिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे सर्वसत्ताधिश शी जिनपिंग आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन व दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाइ यांची भेट झाली. जागतिक शांततेच्या दृष्टीने या दोन्ही भेटी ऐतिहासिक आहेत.

उत्तर कोरियाचा शक्तिशाली हुकूमशहा किम जोंग उनच्या अनाकलनीय व भयावह निर्णयांमुळे गेले कित्तेक महिने तिसरे महायुद्ध होईल की काय अशी भयग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. 27 एप्रिलला कट्टर दुष्मन दक्षिण कोरियाच्या हद्दीत किम जोंगने सीमा ओलांडून पाऊल टाकले आणि संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास टाकला. डोकलाम संघर्षांनंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध विकोपाला गेल्यानंतरचा मोदींचा हा चीन दौरा होता. चर्चेत भारत-चीन संबंध सुधारण्याचा निर्धार करण्यात आला. मोदी आणि जिनपिंग यांनी अनौपचारिक शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशीच हा दृढ निर्धार व्यक्त केला. दोन दिवसात दोन्ही नेते सहा वेळा भेटले. चीनसारख्या मोठया देशाचा अध्यक्ष तशाच मोठया देशाच्या पंतप्रधानाला पूर्ण दोन दिवस, तेही राजधानीबाहेर देतो ही साधी गोष्ट नाही. दोन्ही देशांना आपसात न भांडता एकमेकांची गरज आहे हे दोन्ही बाजुंनी स्विकारले आहे, हे या भेटीचे मोठे फलित आहे.

स्वतःच्या घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या मदतीसाठी चीनला भारताच्या बाजारपेठेची गरज पूर्वीही होती व आता अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे अधिक आहे. जगातील 40% लोकसंख्या रहात असलेल्या चीन व भारत या दोन्ही देशांना प्रगतीसाठी सहकार्य करण्याला पर्याय नाही हे दोन्ही देशांना पटले आहे, हे या दोन दिवसांच्या भेटीने दाखवून दिले आहे. डोकलाम वादाच्या वेळी भारताने दाखवलेल्या कणखरपणामुळेच चीनला सामोपचाराची भूमिका घेणे भाग पडले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आल्यानंतर चीनने सीमेवर कुरघोडी केली होती.

चीन हा देश साम्राज्यवादी आणि विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीच. त्याचे सर्वच शेजाऱ्यांशी वाद चालू आहेत. डोकलामवाद सुरू असताना तयार झालेल्या तणावावर मोदी गप्प का, असा प्रश्न त्यावेळी राहुल गांधींनी विचारला होता. आताही डोकलाम वाद व पाकव्याप्त काश्‍मीरमधील चीनने बांधलेल्या रस्त्यावर मोदी बोलणार आहेत का, असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष या नात्याने असे प्रश्न विचारण्याचा त्यांना हक्कही आहे. पण सन 1962 मधील युद्धात चीनकडून भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता हे त्यांना विसरून चालणार नाही.
डोकलामवरून चीन व भारतामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना राहुल गांधी गुप्तपणे चीनच्या राजदूतांना भेटले आणि ही भेट थेट चीनच्या कार्यालयाकडून उघड होताच संपूर्ण दिवसभर बनवाबनवी करणे ही घटना एवढ्या मोठया पक्षाला शोभणारी नव्हती. या घटनेकडे केवळ एक योगायोग वा अपघात म्हणून पाहता येणार नाही.

चीनचे शेजारील राष्ट्रांशी ताणलेले संबंध, अमेरिकेबरोबर सुरू झालेले व्यापार युद्ध, डोकलाम वादाच्या वेळी भारताने घेतलेली ठाम भूमिका व जपान, अमेरिका, इस्रायल, इंग्लंड, फ्रान्स,जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाबरोबर मोदी सरकारने तयार केलेले खास संबंध यामुळे चीनला भारताबरोबर सकारात्मक व सहकार्याची भूमिका घेणे भाग पडले आहे.
दरम्यान, उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जॉंग-उन यांनी 27 एप्रिल रोजी सीमोल्लंघन करत दक्षिण कोरियाचे नेते मून जे-इन यांच्याशी चर्चा केली. दोन्ही कोरियांसाठी जागतिक शांतेसाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता. सीमेजवळच झालेल्या बैठकीत त्यांनी कोरिया द्विपकल्पात शांतात प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं. सन 1953 मध्ये दोन्ही कोरियांमधलं युद्ध संपलं होतं. युद्धविरामानंतर म्हणजे तब्बल 65 वर्षानंतर कुठल्याही कोरियन राष्ट्रप्रमुखाची ही दुसऱ्या कोरियाची सीमा ओलांडण्याची पहिलीच वेळ होती. युद्धविरामानंतर दोन्ही देशांमधलं वैर दिवसेंदिवस वाढतंच गेलं. पण उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांनी आता युद्ध टाळण्यासाठी अण्वस्त्र नष्ट करण्याचा या भेटीत निर्धार केला आहे. उत्तर कोरियातील पूंगेरीचे अणू चाचणी परीक्षण स्थळ जाहिररित्या बंद केलं जाणार आहे.

यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या तज्ज्ञांना निमंत्रित केले जाणार आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जॉंग-उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जे-इन यांनी शुक्रवारी 27 एप्रिल 2018 रोजी कोरियन द्वीपकल्पात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आण्विक निःशस्त्रीकरणाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. उत्तर कोरियाच्या नेतृत्वाबरोबर आगामी तीन किंवा चार आठवड्यांमध्ये कोरियन द्वीपकल्पाचं आण्विक निःशस्त्रीकरण करण्यासाठी आपण चर्चा करणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी शनिवारी म्हटलं होतं. या घटनेतील चीनच्या सहकार्याबद्दल ट्रम्प महोदयांनी जाहीर कौतुक केले आहे. राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते यून यॉंग-चान यांच्या म्हणण्यानुसार किम जॉंग-उन यांनी मे महिन्यात अणू चाचणी परीक्षण स्थळ बंद करणार असल्याचं सांगितलं आहे. उत्तर कोरियाच्या नेतृत्वानं हेही सांगितलं की, आंतरराष्ट्रीय समुदायाला या प्रक्रियेतील पारदर्शकता लक्षात यावी म्हणून ते दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या तज्ज्ञांनाही निमंत्रित केलं जाणार आहे. ही फार आशादायक गोष्ट आहे.

उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या टाइम झोनमध्ये अर्ध्या तासाचा फरक आहे. दक्षिण कोरियाच्या टाइम झोननुसार उत्तर कोरिया टाइम झोनमध्ये बदल करणार असल्याचंही राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आलं होतं व आता तसा बदलही करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात उत्तर कोरियाने अनेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेत अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियावर हल्ले करण्याची भाषा केली होती. त्याला उत्तर म्हणून डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरिया बेचिराख करून, असं ट्‌वीट केलं होतं. या चर्चेतून हे स्पष्ट नाही होऊ शकलं की आण्विक निःशस्त्रीकरण कोणत्या पद्धतीने आणि कधीपर्यंत केलं जाईल. यापूर्वीही असे निर्धार व्यक्त केले होते, पण वास्तवात काही घडलं नव्हतं, त्यामुळे अनेक जाणकार साशंक आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button