breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कचऱ्याचा त्रास; जनआंदोलन उभारू – सचिन चिखले

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निर्माण होणारा कचरा निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून जवळ असलेल्या लष्कराच्या माळरानावर जाळला जात आहे. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, निगडी गावठाण, रुपीनगर, यमुनानगर, त्रिवेणीनगर व प्राधिकरण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. अन्यथा शहरातील पर्यावरणप्रेमींचे मोठे जनआंदोलन उभारू, असा इशारा पिंपरी चिंचवड शहर मनसे अध्यक्ष तथा मनसे गटनेता सचिन चिखले यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त व देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या प्रसिद्धीपत्रकात सचिन चिखले यांनी म्हटले आहे की, देहूरोड बोर्डाच्या हद्दीत दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. हा कचरा बोर्डाच्या जकात नाक्यासमोरील माळरानावर आणून टाकला जातो. त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. विल्हेवाटीसाठी कचऱ्याला आग लावली जाते. आग लावल्याने जळणाऱ्या कचऱ्यापासून मोठ्या प्रमाणात धूर निघतो. हा धूर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रुपीनगर, यमुनानगर आणि प्राधिकरण भागापर्यंत पोचत आहे.

गेल्या काही दिवसांपासून धुमसणाऱ्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निघत असून, महापालिका हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, निगडी गावठाण, रुपीनगर, यमुनानगर, त्रिवेणीनगर आणि प्राधिकरण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात प्रचंड मोठा जनसमुदाय वास्तव्यास आहे. कचऱ्याच्या अशुद्ध हवेमुळे परिसरातील स्वच्छ हवा प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा सर्वात जास्त त्रास लहान मुलं, वृद्धांना होत असून, श्वसनाची गंभीर समस्या उद्भवत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक केंद्रही आहेत. त्यांनाही या समस्येचा त्रास होत आहे. या कारणामुळे बहुतांशी आस्थापनांनी या परिसरातून काढता पाय घेतला आहे. ती चाकण औद्योगिक परिसरात स्थलांतरीत झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या महसुली उत्पन्नावरही त्याचा परिणाम झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने याबाबतीत देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाशी पत्रव्यवहार करून, कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निर्माण होणारा कचरा लष्करी हद्दीपासून जवळच असणाऱ्या नागरी भागातील माळरानावर न टाकता व न जाळता त्या कचऱ्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया करूनच कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी सूचना करावी. जेणेकरून महापालिका हद्दीतील नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. यासाठी तातडीने पावले उचलावीत. अन्यथा कँटोन्मेंट बोर्डाच्या या मनमानी कारभाराविरोधात व महापालिका प्रशासनाच्या विरोधात रहिवाशी व पर्यावरणप्रेमींची मोट बांधून महापालिका व देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या दालनासमोर आंदोलन करावे लागेल, असा इशारा चिखले यांनी या पत्रकात दिला आहे.

सन २०१७ च्या एप्रिल महिन्यात या ठिकाणी मोठी आगीची घटना घडली होती. देहूरोड कॅन्टोन्मेट बोर्डाच्या निगडीजवळील कचरा डेपोला अचानक लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठले होते. पूर्वेकडे वारे वाहत असल्याने या धुराचा निगडीजवळील ओटास्कीम, नेहरूनगर आणि यमुनानगर भागातील नागरिकांना श्वसनाचा त्रास उद्भवला. त्याचा त्रास अजूनही परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. वारंवार याबाबतीत पत्रव्यवहार करूनही समस्या सुटत नाही. दोन्ही प्रशासनं ढिम्म आहेत. यापुढे अशीच वागणूक मिळाल्यास पर्यावरणप्रेमींचे मोठे जनआंदोलन उभारू, असा इशारा चिखले यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button