breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

देशाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांची गरज – शरद पवार

नवी दिल्ली – देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणकारांसोबत बोलण्याची नितांत गरज आहे. देशाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या व्यक्तीची 100% गरज आहे” असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात पवारांनी ‘पाकिस्तान नव्हे, तर चीन हाच आपला शत्रू आहे’ असे निक्षून सांगितले. चीनबरोबरचा संघर्ष लष्करी ताकदीने सुटणार नाही, तो डिप्लोमॅटिक पद्धतीनेच सोडवावा लागेल, असं पवार म्हणाले.

“मी नरेंद्र मोदी यांचा गुरु आहे, असं म्हणून त्यांना किंवा मला अडचणीत आणू नका. राजकारणात कुणी कुणाचा गुरु नसतो, आपली राजकीय सोय म्हणून बोलतात. मोदींनी जाणकारांसोबत बोलण्याची नितांत गरज आहे. देशाला मनमोहन सिंह यांच्यासारख्या व्यक्तीची 100% गरज आहे. मनमोहन सिंग, नरसिंहराव यांनी देशाला आर्थिक दिशा दिली. मोदींनी मनमोहन सिंगांशी बोलून पावले टाकायला हवी. संकट मोठं आहे. एका पक्षाच्या विचाराने काही होणार नाही. मोदींच्या सेटअपमध्ये संकटांचा अनुभव असलेले लोक नाहीत. मनमोहन सिंग, चिदंबरम विरोधकांशीही तासंतास बोलत” असं पवार यांनी सांगितलं.

पाकिस्तानला पहिला शत्रू आहे, असे भारतीय लोक मानतात. मात्र, भारतात संकट निर्माण करण्याची ताकद चीनमध्येच आहे. पाकिस्तान आणि चीनच्या लष्करी शक्तीत मोठा फरक आहे. चीनच्या शत्रुत्वाचा खूप दीर्घ परिणाम होणार आहे. लष्करीदृष्ट्या चीन आपल्यापेक्षा दहापट ताकदवान आहे. 30 वर्षांपूर्वी भारत चीनचं कधीही टार्गेट नव्हते. अमेरिका व जपान हेच पहिल्यापासून टार्गेट होते. शेजारी देशांबद्दल 30 वर्षांपूर्वी चीन शांत होता. मात्र, आता चीन आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने भारत त्यांच्या लक्ष्यावर आहे. हस्तांदोलन, गळाभेटीनं सगळं शक्य होत नाही, हे मोदींना कळलंय. चीनने आपले शेजारी पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका यांना आपलेसे करुन भारताला घेरले आहे, असे पवार म्हणाले.

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यापूर्वी चीनसोबत आपले सहकार्याचेच संबंध होते. चीन आज ना उद्या महासत्ता बनणार हे नेहरुंना माहित होते. चीनबरोबर संघर्ष दोघांच्याही हिताचा नाही, असे नेहरुंना वाटे. पण नेहरुंसोबत दुर्दैवाने चीनने वेगळी भूमिका घेऊन संघर्ष केला. नेहरु-इंदिरा-वाजपेयींचे परराष्ट्र धोरण आताही तेच आहे. मोदींनी परराष्ट्र धोरण बदलले म्हणतात, पण ते खरे नाही, असे शरद पवार म्हणाले. राहुल गांधी म्हणतात, चीनने जमीन बळकावली, ते बरोबर आहे. आपण जगामार्फत चीनवर दबाव आणून प्रश्न सोडवावा. आपण चीनवर प्रतिहल्ले करण्याऐवजी राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवावा. प्रतिहल्ले केलेच तर त्यानंतरच्या हल्ल्यांनाही तयार राहायला पाहिजे, असा इशारा पवारांनी दिला.

आमचा विद्यार्थी सहजपणे प्रश्न सोडवेल

“सहा महिने झाले तरी सरकारची अजून परीक्षा झाली नाही. सरकारच्या परीक्षेचे प्रॅक्टीकल अजून बाकी आहे. सरकार सत्र परीक्षेत पास आहे, अंतिम परीक्षा बाकी आहे, मात्र आमचा विद्यार्थी पुढचे प्रश्न सहजपणे सोडवेल” अशा शब्दात शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

कोरोनामुळे सरकारचे उत्पन्न घटले

“मुंबईत बँका आणल्या, पण व्यवहारच ठप्प झाले आहेत. मुंबईचे आर्थिक केंद्र गुजरातला हलवणे हे कोरानोसारखे संकट आहे. लोकांनाही कळतंय सरकारचंही उत्पन्न घटलं आहे. सरकारला वाटत होते 3.90 लाख कोटी येतील. मात्र, कोरोनामुळे सरकारचे उत्पन्न निम्म्याने घटले. सरकारला कर्ज काढण्याची वेळ येणारच. केंद्रालाही राज्यांमधूनच उत्पन्न मिळते. केंद्राला आपले दुकान चालवायला राज्यांचे दुकान चालवावे लागते. केंद्राकडे रिझर्व बँक आहे, बाहेरच्या बँका आहेत. केंद्र सरकारकडे नोटा छापण्याचा अधिकार आहे. मात्र, राज्यांना केंद्राला विचारल्याशिवाय कर्ज उचलता येत नाही” असं शरद पवार म्हणाले. “अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन हे सर्वात मोठे आव्हान आहे. शेतमाल, शेतीपूरक उत्पादनासाठी मार्केटच नव्हते. अनेक कारखान्यांची कामगारांना वेतन देण्याची कुवत नाही. कामगार, कष्टकऱ्यांचा प्रपंच चालणे अवघड बनले आहे.” अशी खंत शरद पवार यांनी बोलून दाखवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button