breaking-newsपुणेराष्ट्रिय

देशही पेटवायचा होता…

  • माओवादी विचार पसरवणे हाच एल्गार परिषदेचा उद्देश

  • विशेष न्यायालयात सरकारी वकिलांचा युक्‍तीवाद

पुणे- माओवादी विचार पोहचवणे हाच पुण्यात आयोजित एल्गार परिषदेमागचा हेतू होता. यामध्ये समाजात तेढ निर्माण करणारे आणि भडकावू वक्तव्ये केली गेली. त्यांना भीमा-कोरेगाव दंगलीप्रमाणे देशही पेटवायचा होता. एल्गार परिषदेसाठी “फंडिंग’ झाल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून मुंबई, ठाणे, दिल्ली, हैद्राबाद, फरिदाबाद आणि रांची शहरातील सहा जणांच्या घरावर पुणे शहर पोलिसांनी मंगळवारी छापे टाकले. त्यांच्या घराची झाडाझडती घेत कागदपत्रे, लॅपटॉप, पेनड्राइव्ह आदी साहित्य जप्त केले आहे. त्यातील हैद्राबाद येथील कवी वरवरा रावसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

वरवरा राव (रा. हैद्राबाद), गौतम नवलखा (दिल्ली) आणि सुधा भारद्वाज (फरिदाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह स्टॅन स्वामी (रांची, झारखंड), वरनोन गोन्साल्विज (मुंबई) आणि अरूण परेरा (ठाणे) यांच्या घराचीही झडती घेत त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेचे आयोजन केले गेले होते. त्यानंतर भीमा कोरेगाव येथे हिंसाचार उसळला होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास करत एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे (मुंबई) तसेच रोना विल्सन (दिल्ली), अॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन आणि महेश राउत (तिघे रा. नागपूर) यांना पुणे शहर पोलिसांनी अटक केली होती. देशात बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी ते संबंधित आहेत. अटकेतील व्यक्‍तींची चौकशी केली तसेच त्यांच्या घरात सापडलेले कागदपत्रे, ई-मेल, आदींची पडताळणी केली. त्यामध्ये वरवरा रावसह सुधा भारद्वाज, वरनोन गोन्साल्विज, अरूण परेरा, स्टॅन स्वामी, गौतम नवलखा या सहा जणांची नावे समोर आली.

यातील वरवरा राव, वरनोन गोन्वाल्विज, अरुण परेरा बुधवारी विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी पोलिसांची बाजू मांडली.

हत्यारे खरेदीचा कॅटलॉग सापडला
अटक आरोपी नेपाळ आणि मणिपूर येथून हत्यारे खरेदी करणार होते. यासंदर्भातील कॅटलॉग त्यांच्याकडे सापडला आहे. वरवरा राव हा सातत्याने नेपाळ व मणिपूर येथे संपर्कात होता. एल्गार परिषदेत प्रत्येक आरोपीचा “रोल’ वेगवेगळा आहे. त्यांच्याकडे सापडलेल्या पत्रांवरून हे सिद्ध होत आहे. त्यांच्याकडे इलेक्‍ट्रॉनिक्‍स साधने सापडली असून ते इंटेलिजन्स आहेत, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले

नोटाबंदीचा नक्षलवाद्यांनाही फटका
आरोपींकडे सापडलेल्या पत्रव्यवहारातून नोटाबंदीचा फटका नक्षलवाद्यांना बसल्याचे दिसत आहे. गडचिरोली येथे निधी वेळेवर न पोहचल्याचा पत्रव्यवहार आहे. यामध्ये नोटाबंदीच्या काळात पोलीस ठिकठिकाणी वाहने तपासत असल्याने निधी वेळेवर पोहचवता न आल्याचा उल्लेख आहे. निधी वेळेवर न पोहचल्याने यातून काही जण बाहेर पडल्याचाही उल्लेख पत्रात आहे.

शहरी नक्षलवाद उघड  
आरोपींनी शहरी भागातील तरुणांना एकत्रित करुन सत्तेविरोधात चिथावले. तसेच त्यांच्या सोबत शस्त्रांबरोबर निधीची उभारणी केली. त्यांना नक्षलवादी परिसरात प्रशिक्षणही देण्यात आले. आरोपींची ही कार्यप्रणाली असल्याचे न्यायालयात सरकारी पक्षाने स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button