breaking-newsआंतरराष्टीय

दुबई: पंतप्रधानांच्या सहाव्या पत्नीने लंडन कोर्टात मागितले संरक्षण

संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) पंतप्रधान आणि दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांची सहावी पत्नी हया बिंत अल हुसेन 31 दशलक्ष पौंड इतकी रक्कम घेऊन देश सोडून गेल्याचं वृत्त समोर आलं होतं. आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन हया यांनी देश सोडला. त्यानंतर त्या लंडनमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, त्यांनी आता लंडन न्यायालयाकडे संरक्षण मागितले असल्याची माहिती समोर आली आहे.

दुबईचे राजे शेख मोहम्मद यांच्याकडे हया यांनी तलाक मागितला होता. मात्र, अद्याप दोघांचा तलाक झालेला नाही. हया जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची सावत्र बहीण आहेत. दरम्यान, दुबईच्या पंतप्रधानांविरोधात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईदरम्यान त्या पहिल्यांदाच लंडनमधील कौटुंबिक न्यायालयासमोर हजर झाल्या. ब्रिटनमधील प्रेस असोसिएशन वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वीच हया बिंत अल हुसेन यांनी आपल्या मुलांसह दुबईतून पळ काढला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा ब्रिटीश अंगरक्षकदेखील उपस्थित होता. दरम्यान, शेख मोहम्मद यांनी आपल्या मुलांना दुबईत परतण्याचे आवाहन केले आहे. ब्रिटनच्या कायद्याप्रमाणे ‘फोर्स्ड मॅरेज प्रोटेक्शन ऑर्डर’अंतर्गत कोणत्याही व्यक्तीचे जबरदस्ती लग्न लावून दिल्यास त्यांना त्याविरोधात संरक्षण देण्यात येते.

प्रेस असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, शेख आणि राजकुमारी हया यांनी याच महिन्यात कौटुंबिक न्यायालयात सुनावणी सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. तसेच आपल्या मुलांच्या पालकत्वाशी निगडीत हा विषय असून संपत्ती किंवा तलाक याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे दोघांकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, कोर्टरूम परिसरात माध्यमांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच ही सुनावणी गोपनीय ठेवण्यात आली होती. हया शेख मोहम्मद परिवारातील तिसऱ्या सदस्य आहेत, ज्यांनी दुबईतून पलायन केले आहे. यापूर्वी शेखच्या अन्य पत्नींनीही दुबईतून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता.

2004 साली हया यांनी शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांच्याशी विवाह केला होता. मीडिया रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार त्या दुबईतून खासगी जेटमधून पहिल्यांदा जर्मनीत गेल्या आणि त्यानंतर त्या लंडनमध्ये पोहोचल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या दुबईतून पलायन करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शेख मोहम्मद यांना सहा विवाहांमधून 23 मुले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button