breaking-newsक्रिडा

दीपाची २०२०च्या पॅरालिम्पिकमधून माघार!

भारताची नामांकित गोळाफेकपटू दीपा मलिकने पाठीच्या कण्याच्या दुखापतीमुळे २०२०च्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. दुखापतींतून सावरण्यासाठी अधिक काळ लागत असल्याने दीपा जलतरणाकडे वळण्याचा धक्कादायक निर्णय घेण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२०१६च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत गोळाफेक प्रकारात रौप्यपदक मिळवणारी दीपा ही पहिली भारतीय महिला ठरली होती. परंतु २०२०च्या पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक आणि भालाफेक या दोन क्रीडाप्रकारांचा समावेश नाही. त्यामुळे दीपा क्रीडाप्रकार बदलण्याचा विचार करत असावी. वांद्रे-कुर्ला संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका क्रीडा संस्थेच्या संमेलन समारंभासाठी दीपा उपस्थित होती.

‘‘पुढील स्पर्धाचा विचार करता २०२०च्या पॅरालिम्पिकमध्ये मी ज्या दोन खेळांत भारताचे प्रतिनिधित्व करू शकते, त्या खेळांचा समावेशच नाही. ५३ किलो वजनी गटात मला गोळाफेक आणि भालाफेकमध्ये खेळायचे होते; परंतु आता मी फक्त थाळीफेकमध्येच सहभागी होऊ शकते. त्यामुळे मी जलतरणाकडे वळण्याचा विचार करत आहे,’’ असे दीपा म्हणाली. गेल्या वर्षभरापासून दीपाला पाठीच्या कण्याचा त्रास सुरू असून तिला गोळाफेकीसाठी आवश्यक तंदुरुस्ती राखण्यात अपयश येत आहे.

‘‘गेल्या काही महिन्यांपासून मी थाळीफेकवर प्रामुख्याने भर देत आहे. हा माझा मुख्य खेळ नाही, तरीही २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मी थाळीफेकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. त्यामुळेच जर २०२०च्या पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा निर्णय पक्का केला, तर मी थाळीफेकच खेळू शकेन,’’ असे ४८ वर्षीय दीपाने सांगितले. जलतरणात पाठीला अधिक त्रास होण्याची शक्यता कमी असून त्यामुळे मी स्वत:च्या शरीरयष्टीवरसुद्धा लक्ष घेऊ शकते, असे दीपा म्हणाली.

पॅरा-अ‍ॅथलिट्ससाठी आधारभूत संरचना आवश्यक

भारतात आजही पॅरा-अ‍ॅथलिट्ससाठी आवश्यक संरचना आणि सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, अशी खंत दीपाने व्यक्त केली. ‘‘आपल्याकडे अनेक पॅरा-अ‍ॅथलिट्सना विविध खेळांतील कौशल्य अवगत आहे; परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक, फिजिओथिरपिस्ट यांची उणीव आहे. त्यामुळे व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) मोहिमेंतर्गत खेळाडूंच्या सोयीसुविधांकडे लक्ष पुरवण्याची आवश्यकता आहे,’’ असे दीपाने कार्यक्रमाच्या शेवटी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button