breaking-newsपुणे

दिवाळीत एटीएममधून पैसे काढताना काळजी घ्या!

  • संशयास्पद व्यक्ती आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन

दिवाळीत विविध बँकांच्या एटीएम यंत्रातून पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी होते. अशा वेळी एटीएम केंद्राच्या बाहेर चोरटय़ांचा वावर असतो. गडबडीत असलेल्या नागरिकांचे लक्ष विचलित करून चोरटे डेबिट कार्ड लांबवून त्याचा दुरुपयोग करतात. या पाश्र्वभूमीवर सायबर गुन्हे शाखेने एटीएम केंद्रातून पैसे काढणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याची सूचना केली आहे. एटीएम यंत्राबाहेर संशयास्पद व्यक्तीचा वावर आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.

दिवाळीत एटीएम यंत्रातून पैसे काढण्याचे प्रमाण वाढते. गेल्या वर्षी एटीएम यंत्रातून पैसे काढणाऱ्या नागरिकांची डेबिट कार्ड चोरून त्याचा दुरुपयोग करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. काही चोरटे एटीएम यंत्रात बिघाड करतात. त्यानंतर पैसे काढणाऱ्या नागरिकाला मदत करण्याचा बहाणा करून पैसे लांबवतात. या पाश्र्वभूमीवर सायबर गुन्हे शाखेकडून नागरिकांनी पैसे काढताना सतर्क असणे गरजेचे असल्याचे आवाहन केले आहे. या बाबत सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे म्हणाले, दिवाळीत सर्वाधिक व्यवहार एटीएम केंद्रातून होतात. गेल्या काही वर्षांत बँकेत जाऊन पैसे काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अनेक जण गरजेनुसार एटीएम यंत्रातून पैसे काढतात. एटीएम केंद्राबाहेर गर्दी असते. त्यामुळे गर्दीत एखाद्या नागरिकाचे लक्ष विचलित करून त्याला गंडा घातला जातो. एटीएममधून पैसे काढणारे ज्येष्ठ नागरिकांवर चोरटे पाळत ठेवतात. बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांना पैसे काढताना अडचण येते. अशा वेळी चोरटे मदत करण्याचा बहाणा करून फसवणूक करतात. त्यामुळे एटीएम केंद्राबाहेर एखादी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. एटीएम केंद्राच्या बाहेर थांबलेल्या रखवालदाराला या बाबतीत माहिती द्यावी.

दिवाळीत ऑनलाइन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक असून डेबिट कार्डचा सांकेतिक शब्दांत सतत बदल करावा. काही एटीएम यंत्रात स्कीमर, छुपा कॅमेरा लावलेला असतो. एटीएम यंत्रातून कार्ड टाकल्यानंतर त्याची माहिती स्कीमरद्वारे चोरली जाते. स्कीमर एक प्रकारची चुंबकीय पट्टी आहे. डेबिट कार्डची माहिती चोरल्यानंतर चोरटे त्या माहितीचा गैरवापर क रून बनावट कार्ड तयार करतात. बनावट कार्डचा वापर करून चोरटे पैसे काढतात. त्यामुळे एटीएम यंत्रातून पैसे काढताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलीस निरीक्षक पायगुडे यांनी केले.

सायबर गुन्हे शाखेच्या सूचना

  • एटीएम केंद्राबाहेर संशयास्पद व्यक्ती आढळल्यास माहिती द्या
  • एटीएम केंद्रात छुपा कॅमेरा, स्कीमर आढळल्यास त्वरित तक्रार करा
  • ऑनलाइन खरेदी करताना कंपनीचे नाव वाचा, नावाची खातरजमा करा
  • डेबिट कार्डचा सांकेतिक शब्द सातत्याने बदला
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button