breaking-newsराष्ट्रिय
दिल्ली-भागलपूर एक्स्प्रेसमध्ये मोठा दरोडा; गोळीबार, चाकू हल्ला करीत प्रवाशांना मारहाण
बिहारमध्ये नवी दिल्ली-भागलपूर एक्स्प्रेसमध्ये मोठ्या दरोडा पडल्याचे वृत्त आहे. दरोडेखोरांनी बंदुक आणि धारदार शस्त्रांच्या सहाय्याने प्रवाशांना मारहाण करीत मोठी लूट केली आहे. सुमारे २५ लाख रुपये, दागिने आणि मोबाईल फोन्स असा मुद्देमाल त्यांनी लांबवल्याचे माध्यमांतील वृत्तांतून कळते. लखीसराई जिल्ह्यातील धनौरी-काजरा भागात ही घटना घडली.
पटना-भागलपूर १२३५० या एक्स्प्रेसची आपत्कालीन चैन ओढून गाडी एका निर्मनुष्य ठिकाणी थांबवण्यात आली. त्यानंतर सुमारे एक तास ही एक्स्प्रेस येथेच थांबवण्यात आली. दरम्यान, दरोडेखोरांनी प्रवाशांची लाखोंची संपत्ती लुटून नेली. दरोडा यशस्वी झाल्यानंतर लुटारू घटनास्थळावरुन पसार झाले. त्यानंतर एक्स्प्रेस जमालपूरच्या दिशेने रवाना झाली.
याप्रकरणी रेल्वे पोलिसांचे डीसीपी सियाराम प्रसाद गुप्ता यांनी सांगितले की, एक्स्प्रेस जमालपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रवाशांकडे चौकशी करुन आरोपींची ओळख पटवण्यात येणार असून त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.