दिग्विजय सिंह यांच्या माफीनाम्यानंतर गडकरींची मानहानी केस मागे!
नवी दिल्ली – दिग्विजय सिंह यांनी सादर केलेल्या माफीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावरील मानहानीची केस मागे घेतली आहे. अशा प्रकारे दोन नेत्यांमधील मानहानी केसचे आणखी एक प्रकरण निकाली निघाले आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी गडकरी आणि अजय संचेती यांच्या संबधात केलेल्या वक्तव्याबाबत सन 2012 मध्ये दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात मानहानी केस दाखल केली होती.
दिग्विजय सिंह यांनी नितीन गडकरी यांच्या संबंधात केलेल्या वक्तव्याबाबत माफीनामा सादर केला आहे. आपण तेव्हा केलेले आरोप हे राजकीय आवेशात केलेले होते आणि त्यात काहीही तथ्य नाही, असे दिग्विजय सिंह यांनी गडकरींना पत्र लिहून कळवले आहे. त्यानंतर गडकरींनी दिग्विजय सिंह यांना माफ केले. गडकरी आणि दिग्विजय सिंह या दोघांनी न्यायालयात संयुक्त निवेदन देऊन केस मागे घेण्याबाबत विनंती केली होती. ती न्यायालयाने मान्य केली आणि हे प्रकरण निकालात निघाले.
यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप चे नेते अरविंद केजरीवाल यांनीही गडकरी यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांबाबत माफीनामा दिल्याने त्यांच्याविरुद्धची मानहानी केस मागे घेण्यात आली होती.