breaking-newsपिंपरी / चिंचवड

दापोडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्या, जखमींच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी घ्या

  • राष्ट्रवादी कार्यकर्ते संदीप काटे यांनी केली आयुक्तांकडे मागणी
  • या दुर्घटनेला जबाबदार मनपा प्रशासनाचा केला जाहीर निषेध

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

दापोडी येथे पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या कर्मचा-याला वाचवण्याच्या प्रयत्नात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनातील एक आणि ठेकेदाराकडील एक अशा दोन कर्मचा-यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच, रविवारी (दि. 1) शासकीय सुट्टीच्या दिवशी ठेकेदाराला काम करण्याची परवानगी कोणी दिली?, याची उच्चस्तरीय चौकशी करावी. दोषी अधिका-यावर कडक कारवाई करावी. तसेच, मृत्यू पावलेल्या आणि जखमी कर्मचा-यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी. मृतांच्या कुटुंबातील सदस्याला पालिकेच्या प्रशासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी पालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी ड्रेनेजचे पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्यात ठेकेदाराचा कर्मचारी नागेश जमादार मातीच्या ढिगा-याखाली अडकले. त्यांना वाचवण्यासाठी अग्निशामक विभागातील फायरमन विशाल जाधव यांनी शर्तीचे प्रयत्न केले. हे काम करताना मातीचा ढिगारा अंगावर पडून विशाल जाधव हे देखील ढिगार-याखाली अडकले. यात ठेकेदाराकडील नागेश जमादार आणि विशाल जाधव या दोघांचं निधन झालं. याशिवाय आपत्ती व्यवस्थापनातील दोन कर्मचारी निखील गोगावले व सरोज फुंडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेने अमृत योजनेअंतर्गत शहरातील मलनि:सारण व्यवस्था व प्रकल्प राबण्याचे काम मे.पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीला दिले आहे. मात्र, या कामासाठी उपठेकेदाराची नेमणूक केल्याची माहिती समोर आली आहे. उपठेकेदाराकडून हे काम करवून घेण्याची पालिकेने मूळ ठेकेदाराला परवानगी कोणत्या अटींवर दिली?. तसेच, काल रविवारी शासकीय सुट्टी असताना ठेकेदार काम कसे करू शकतो ?. काम करताना कामगारांच्या सुरक्षीततेची कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती. सुट्टीच्या दिवशी काम करण्यासाठी ठेकेदाराने पालिका प्रशासनाची परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. याची सखोल चौकशी करावी. दोषी अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संदीप काटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

जाधव यांच्या कुटुंबातील सदस्याला पालिकेत नोकरी द्या

दापोडी येथील दुर्घटनेत खड्ड्यात मातीच्या ढिगा-याखाली अडकून महापालिकेतील अग्निशामक दलाचे फायरमन विशाल जाधव आणि ठेकेदाराकडील कर्मचारी नागेश जमादार यांचे निधन झाले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. याला पालिकेचे प्रशासनच जबाबदार आहे. या निधान पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांना पालिकेतर्फे आर्थिक मदत देण्यात यावी. विशाल जाधव यांच्या कुटुंबातील सदस्याला पालिकेत नोकरी द्यावी. जखमी निखील गोगावले व सरोज फुंडे यांच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी पालिकेने घ्यावी, अशी मागणी कार्यकर्ते संदीप काटे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button