breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दाई-ईची करकरिया कंपनी समोर कर्मचारी कुटूंबियांचे बोंब मारो आंदोलन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील दाई-ईची करकरिया कंपनी समोर कर्मचा-यांच्या कुटूंबियांनी कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात बोंब मारो आंदोलन केले. येथील कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कंपनी व्यवस्थापन, श्रम मंत्रालय व कामगार आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी मागील त्रेचाळीस दिवसांपासून चक्री उपोषण सुरु आहे.
या कंपनीत असलेल्या हिंद कामगार संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कामगार आपल्या न्याय हक्कांसाठी विविध पातळीवर लढत आहेत. दिवाळी सुरु झाली तरी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना नियमानुसार वीस टक्के बोनस, तसेच सर्व कामागारांना पूर्वीप्रमाणे 60 दिवसांची ग्रॅज्यूईटी व जे कामगार 2008 सालानंतर सेवानिवृत्त झालेत, त्यांनाही फरकासह ग्रॅज्यूईटी मिळावी. या मागण्यांसाठी सोमवारी (दि. 5) बोंब मारो आंदोलन करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना व कामगार संघटनेला पूर्णत: अंधारात ठेवून अचानकपणे कंपनी गुजरात येथे स्थलांतरीत करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कंपनीतील मशिनरी काढून गुजरातकडे रवाना करण्यात येत आहे. कामगारांना देशोधडीला लावणारा हा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने कामगार संघटना, राज्य सरकार, उद्योग मंत्रालय, श्रम मंत्रालय यांना सर्वांना अंधारात ठेवून घेतला आहे. याच्या विरोधात हिंद कामगार संघटनेने माननीय न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला आहे. कोर्टाच्या आदेशाची कंपनी व्यवस्थापनाने अंमलबजावणी करावी तसेच सर्व कामागरांना पूर्वीप्रमाणे 60 दिवसांची ग्रॅज्यूईटी व जे कामगार 2008 सालानंतर सेवानिवृत्त झालेत त्यांनाही फरकासह ग्रॅज्यूईटी मिळावी. कायद्याप्रमाणे पूर्व प्रथेप्रमाणे फरकासह बोनस मिळावा. कंपनीने पूर्वीप्रमाणेच उत्पादन सुरु करून ज्या कामगारांना खोट्या आरोपांपोटी कामावरून काढून टाकले आहे त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे. 2008 सालापासून प्रलंबित असलेला कामगार वेतन करार कामगार संघटनेशी चर्चा करून केला पाहिजे. तसेच कामगारांच्या सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरु करण्यात यावी व निवृत्त झालेल्या कामगारांच्या जागेवर नव्याने कायमस्वरूपी कामगारांची भरती करण्यात यावी. व त्यांना संघटनेचे सभासद होण्यासाठी हक्क मिळावेत.
कंपनी स्थलांतरीत करण्याचे हे काम कंपनी व्यवस्थापनाने ताबडतोब बंद करावे. तसेच आतापर्यंत या कपंनीतून बाहेर पाठविण्यात आलेली मशीनरी पुन्हा कंपनीत आणून उत्पादन सुरु करावे. या विषयाबाबतच हिंद कामगार संघटना न्यायालयात लढा लढतच आहे. कंपनी व्यवस्थापनाने सर्व उत्पादन पूर्ववत सुरु करून कामगारांच्या न्याय हक्क मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संघटनेच्या वतीने सुरु असलेले चक्री उपोषण आणखी तीव्र करु असा इशारा कैलास कदम यांनी दिला आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button