breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

दहिसरमध्ये धोकादायक ‘स्कायवॉक ’

काही भाग कोसळल्याने ‘स्कायवॉक’ पाडण्याची रहिवाशांची मागणी

दहिसर पश्चिम येथे प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला स्कायवॉक त्यांच्याच जिवावर टांगती तलवार बनून राहिला आहे. दोन वेळा या स्कायवॉकचा काही भाग कोसळल्यामुळे तो पाडण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. मात्र अद्याप या मागणीची दखल महानगरपालिकेकडून घेतली गेलेली नाही.

दहिसर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरचा रस्ता अरुं द आहे. २००९ मध्ये स्कायवॉकच्या बांधणीचा निर्णय झाल्यावर रहिवाशांनी विरोध करत त्यांना याची गरज नसल्याचे सांगितले होते. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा काहीही फायदा होणार नाही, अशीही त्यांची तक्रार होती. मात्र सरकारी कामात अडथळे आणल्याचा आरोप करत खटले भरण्याची धमकी रहिवाशांना देण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्वाहकाची सोय करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे रहिवाशांना माघार घ्यावी लागली आणि स्कायवॉकचे काम पूर्ण झाले. मात्र अद्याप येथे उद्वाहकाची सोय करण्यात आलेली नाही.

विठ्ठल मंदिर ते दहिसर फाटक असा या स्कायवॉकचा मार्ग असून तो बांधून झाल्यानंतर बरीच वर्षे पडून होता. त्यावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या किरकोळ होती. फारशी रहदारी नसल्याने या स्कायवॉकवर गर्दुल्ले, भिकारी यांचा मुक्त वावर असायचा. त्यामुळे प्रवाशांना असुरक्षित वाटू लागले होते. काही काळ तिथे सुरक्षारक्षक नेमण्यात आला होता. मात्र त्यालाच गर्दुल्ल्यांकडून मार खावा लागला, असे रहिवासी सांगतात.

त्यानंतर २०१६ मध्ये स्कायवॉकचे फायबर क्लायडिंग पडून दोन जण जखमी झाले. त्यामुळे हा स्कायवॉक महापालिकेकडून अधिकृ तरीत्या बंद करण्यात आला. त्याच्या जिन्यांवर ‘हा स्कायवॉक धोकादायक असून पुढील दुरुस्ती होईपर्यंत रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे’, असे फलक लावण्यात आले आहेत.

रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर प्रवासी लगेच रस्त्यावर उतरूशकतात. त्यामुळे स्कायवॉकवर चढण्याचे जास्तीचे कष्ट घेण्यास ते उत्सुक नसतात. शिवाय या स्कायवॉकवरून फार दूरवरचा प्रवासही करता येत नाही. त्यामुळे रेल्वे पुलावरून थेट स्कायवॉकवर येणाऱ्यांनाही त्याचा फारसा फायदा होत नाही. याचे काही खांब हे रस्त्याच्या मधोमध उभे केले आहेत.

त्यामुळे वाहतुकीलाही हा स्कायवॉक अडथळा ठरत आहे. २०१८ मध्ये पुन्हा स्कायवॉकचा काही भाग कोसळून भगदाड पडले. आता संपूर्ण स्कायवॉक कोसळून रहिवाशांचे जीव गेल्यानंतरच पालिकेला जाग येणार का, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.

पालिकेकडून अद्याप उत्तर नाही

हा अनावश्यक आणि धोकादायक स्कायवॉक पाडून टाकावा अशी मागणी करणारे पत्र दहिसरकरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘म्हात्रेवाडी रेसिडेन्ट्स वेल्फेअर असोसिएशन’ने पालिका आयुक्तांना लिहिले आहे. असोसिएशनने राबवलेल्या स्वाक्षरी मोहिमेत चार हजार दहिसरकरांनी स्कायवॉक पाडण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. स्थानिक आमदार आणि नगरसेविकांनीही पालिका आयुक्तांना पत्र लिहून या स्कायवॉकमुळे रहिवाशांच्या जिवाला धोका असून तो पाडण्यात यावा अशी मागणी केली आहे. मात्र या तिन्ही पत्रांना अद्याप उत्तर मिळालेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button