breaking-newsआंतरराष्टीय

दहशतवाद रोखण्याचा ‘ब्रिक्स’ नेत्यांचा निर्धार

  • संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर सर्वंकष धोरण ठरवण्यावर भर

ओसाका : भारतासह ब्रिक्स देशांनी सर्व देशांना दहशतवादाचा अर्थपुरवठा रोखण्याचे आवाहन केले असून कुणीही आपल्या भूमीतून दहशतवादी कारवाया होऊ देऊ नयेत, असा निर्धार व्यक्त केला आहे.

‘जी २०’ देशांच्या शिखर बैठकीनिमित्ताने ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन चर्चा केली. त्यात इंटरनेटचा दहशतवादी कारवायांसाठी होणारा वापर रोखण्याचे ठरवण्यात आले.

संयुक्त निवेदनात या देशांनी म्हटले आहे, की ब्रिक्स देशांच्या वतीने दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करण्यात येत असून हा दहशतवाद कुठल्याही प्रकारचा असो, कुठल्याही भूमीतून झालेला असो तो निषेधार्हच आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर एकत्र राहून सर्वंकष धोरण ठरवण्यावर  भर देण्यात  येत आहे.

कुठल्याही देशाचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह पाच नेत्यांनी दहशतवाद्यांचा अर्थपुवठा रोखणे व त्यांना आपल्या देशातून दहशतवादी कारवाया करण्यापासून रोखणे या दोन्ही गोष्टी रोखण्याची जबाबदारी त्या- त्या देशावर राहील असे स्पष्ट केले.

सध्या इंटरनेटचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला  जात असून माहिती व दूरसंचार तंत्रज्ञानात सुरक्षितता आणण्याची गरज आहे. त्यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांनी विविध देशांच्या सरकारांना त्यांच्या कायद्यानुसार मदत करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

इंडो -पॅसिफिक भागात स्थिरतेसाठी अमेरिका-भारत-जपान चर्चा

ओसाका : अमेरिका, भारत व जपान यांची त्रिपक्षीय बैठक जपानमधील ओसाका येथे जी २० परिषदेच्या निमित्ताने झाली. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे समपदस्थ शिन्जो आबे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात, इंडो-पॅसिफिक प्रदेशातील स्थिती, पायाभूत विकास, हवाई वाहतुकीने जोडणी या मुद्दय़ांचा समावेश होता. तीनही देश एकत्र येऊन इंडो पॅसिफिक भागात खुले, स्थिर व नियमाधिष्ठित वातावरण कसे तयार करू शकतील यावर भर देण्यात आला. जपान-अमेरिका-भारत यांच्या बैठकीत मोदी यांनी भारताच्या दृष्टीने हा त्रिपक्षीय गट महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. पायाभूत सुविधा, शांतता व सुरक्षा, जोडणी या दृष्टिकोनातून इंडो पॅसिफिक भागात एकत्र काम करण्यावर तीनही देशांनी भर दिला असल्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे व भारताचे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. आजची त्रिपक्षीय बैठक यशस्वी झाली असून त्यात व्यापक विषयांवर चर्चा झाली, असे मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे. तीन देशांनी एकत्र येऊन चर्चा  करण्याची ही दुसरी वेळ होती, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर मोदी यांनी स्वतंत्रपणे ट्रम्प यांची  भेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button