breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थरकाप सोडणारा वजीर सुळका चढून गिरीजाने दिला मुलगी वाचवाचा संदेश

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सह्याद्रीच्या कडाकपा-यांना पाहूनच अंगाला थरकाप सुटल्याशिवाय राहत नाही. परंतु, अवघ्या नवव्या वर्षात भोसरीतील गिरीजा लांडगे हिने माहुली किल्ला आणि त्याच्या दक्षिणेकडील टोकाला सुटलेल्या वजीर सुळका सर करून बालवयातच यशस्वी कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहरामधून तिचे कौतुक होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागातील माहुली किल्ला परिसरात असलेल्या चंदेरी दक्षिण गटातील वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून 3 तासांची अतिशय दमछाक करणारी चढाई करावी लागते. त्याच्या पायथ्याशी येणे हे ही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी, पाठीवरील अवजड ओझे यातून जरा जरी पाऊल घसरले तरी दरीच्या जबड्यातच विश्रांती! पाण्याची प्रचंड कमतरता व त्यानंतर वजीर सुळक्याची 90 अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई. याच्या पूर्वेकडील दरीचा उतार तर 600 फुटांचा आहे.

अशा या वजीर सुळक्यावर गरुडभरारी घेण्यासाठी गिरीजा (वय ९) हिच्यासोबत आम्ही १० तारखेला १० वाजता भोसरीतुन निघालो. साधारणपणे ३ च्या दरम्यान शहापुरमधे पोहोचलो. तेथुन आसनगाव वाशिंद मार्गे वांदरे गावातुन न जाता कातबाव गावातुन चाप्याचा पाडा येथे गाड्या लावुन सर्व संसार पाठीवर लादुन निघालो. त्या वजीर सुळ्क्याच्या पायथ्याला वर पाण्याची वाणवा असल्याने आम्ही सर्वानी ६५-७० लि पाणी सोबत त्या गावातून भरुन घेतले. गावातूनन साधारणपणे संध्याकाळी सहा वाजता चालायला सुरुवात केली. दोन वेळा रस्ता चुकलो पण तिसऱ्या घडीला वाट अचुक शोधत निघालो.

साडे तीन तासाच्या झाडझाडोऱ्यातल्या लपलेल्या वाटेवर वर खाली चालत आम्ही थोड्या सपाटीवर आलो आणि तिथेच मुक्कामाला जागा तयार केली. तंबु ठोकले, चुल पेटवुन मसालेभात बनवला. जेवण झाल्यानंतर झोपी गेलो. सकाळी अर्ध्या तासाची चढाई करुन सुळक्याच्या पायथ्याला पोहोचलो. तिथे सर्व इक्विपमेंट चढवले. एका बोल्टची आणि सुळक्याची पुजा केली. नारळ वाढवुन मनोमन सुळक्याची मनधरणी करुन लेकीसाठी आशिर्वाद घेतला. सकाळी ११ वाजता चढाईला सुरुवात केली. गिरीजा एक एक स्टेशन लिलया पार करत होती. २-४ वेळा काही ठीकाणी फॉल झाला, पण परत तितक्याच जिद्दीने ती वजीरवर पाय रोवत होती. आणि अखेर गिरीजाने अफाट जिद्द आणि अचाट इच्छा शक्तिच्या जोरावर ६.३० तासाच्या जीव थकवणाऱ्या आणि अंग आंबवणाऱ्या कष्टाने या वजीर सुळक्याच्या माथ्यावर संध्याकाळी ५.३० वाजता पाय रोवला. त्या जोशातच श्री शिवछत्रपतींची गारद देवुन आसमंत दणाणुन सोडला. यावेळी तिने भारताचा तिरंगा फडकवून लेक वाचवा, लेक जगवा, लेक वाढवा हा संदेश दिला.

मुलगी जन्माला आल्याचा अभिमान वाटला पाहिजे

गिरीजाचे वडील धनाजी लांडगे म्हणतात की गिरीजाचा आता जो विक्रम झाला त्या विक्रमापेक्षा गिरीजाची (जिजाऊची) अवघड अनवट बेलाग बुलंद खमक्या अश्या वजीर सुळक्यावर चढाई का ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.  याचं उत्तर म्हणजे समाजात दिसत असणाऱ्या चित्राप्रमाणे मुलींना दिलं जाणारं दुय्यम स्थान, मुली म्हणजे ओझं हा समज , या सर्व जाणीवेतुन तिला जन्मण्याआधी आणि जन्मल्यानंतर संपवण्याच चालु असणारं सत्र, दर हजारी मुलामागे कमी होत असलेलं मुलींच प्रमाण. हे सर्व कुठंतरी थांबुन मुली जन्मल्यावर आनंदोत्सव झाला पाहीजे. एक मुलगी जन्माला आली तर ती ओझे न वाटता तिचा अभिमान प्रत्येक बापाला आणि जगाला वाटला पाहीजे, म्हणुनच लेक वाचवा लेक जगवा लेक वाढवा हे सांगण्यासाठी ही मोहीम आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button