breaking-newsक्रिडा

तिसऱ्या कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेला आजपासून प्रारंभ

  • एफसी पुणे सिटी संघातर्फे मामुर्डी येथे आयोजन; क्रीडाशौकिनांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य 

पुणे – फुटबॉलच्या माध्यमातून पुणे शहरातील समाजाच्या सर्व स्तरांमधील आबालवृद्ध क्रीडा शौकिनांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून राजेश वाधवान समूह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघातर्फे उद्या दिनांक 9 जूनपासून कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मामुर्डी येथील एफसी पुणे सिटी संघाच्या सराव मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे.

कॉर्पोरेट सुपर कप स्पर्धेच्या गेल्या दोन मालिकांना मिळालेला उत्साही प्रतिसाद आणि आयएसएल फुटबॉल स्पर्धेत एफसी पुणे सिटी संघाची अव्वल चार क्रमांकात स्थान मिळविण्याची चमकदार कामगिरी, यामुळे उत्साहित होऊन आम्ही या नव्या आवृत्तीचे आयोजन केले आहे, असे सांगून एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यातील क्रीडाप्रेमी, तसेच कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा आमचा हेतू आहे. याआधीच्या दोन मालिकांपेक्षा ही तिसरी मालिका अधिक भव्य आणि आकर्षक असेल, अशी आम्ही ग्वाही देतो.

फुटबॉलमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्याचा एफसी पुणे सिटीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघात 11 खेळाडूंचा समावेश असणार आहे. तसेच, पुण्यातील सर्व कॉर्पोरेट कंपन्यांसाठी ही स्पर्धा खुली असून स्पर्धेतील सामने दर शनिवार व रविवार या दिवशी खेळविण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना एक आगळा वेगळा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असेही मोडवेल यांनी नमूद केले.

इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, कन्व्हरर्जीज्‌, कॉग्निझंट, फिनआयक्‍यू आदी अव्वल कॉर्पोरेट संघ स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. स्पर्धेचे उपान्त्य व अंतिम फेरीचे सामने एफसी पुणे सिटीच्या जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या पिरंगुट येथील फुटबॉल मैदानावर होणार आहेत. गतवर्षी या स्पर्धेत फिनआयक्‍यू संघाने विजेतेपद पटकावले होते. तर कॅपजेमिनी संघाने उपविजेतेपद संपादन केले होते.

स्पर्धेतील विजेत्या संघाला आकर्षक करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी संघांना दर्जेदार मॅच किटस्‌, आयएसएल सामन्यांची तिकिटे, एफसी पुणे सिटीचे साहित्य आणि एफसी पुणे सिटी संघातील खेळाडूंना भेटण्याची व त्यांच्याबरोबर सराव करण्याची संधी मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button