breaking-newsपुणेमहाराष्ट्र

तापमान ४० अंशांच्या आसपास राहणार?

पुणे : गेल्या आठवडय़ात पावसाळी स्थितीमुळे तापमानात लक्षणीय घट झाली होती. मात्र, सध्या कोरडय़ा हवामानामुळे कमाल- किमान तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. मंगळवारी (२३ एप्रिल) मतदानाच्या दिवशीही तापमानाचा पारा चढाच राहणार आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका जाणवणार असून, कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. मार्चमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर याच महिन्यात शेवटच्या आठवडय़ापासून राज्यात आणि शहरातही दिवसाच्या तापमानात मोठी वाढ झाली होती. शहरात याच आठवडय़ात तीनदा तापमानाचा पारा ४० अंशांपुढे उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत तापमानातील वाढ कायम होती. त्यानंतर राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर १२ एप्रिलपासून शहरात ढगाळ स्थिती निर्माण झाली. त्यामुळे तापमानात घट होण्यास सुरुवात झाली होती. १३ ते १५ या तीन दिवसांमध्ये शहरात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. काही भागात जोरदार सरींसह गाराही कोसळल्या. त्यानंतर दिवसाच्या तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाली होती. ४० अंशांच्या आसपास असलेले तापमान थेट ३६ ते ३७ अंशांवर आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. त्याचप्रमाणे प्रचारासाठी दिवसभर बाहेर असणारे उमेदवार आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही उन्हाच्या चटक्यांपासून काहीशी सुटका मिळाली.

पावसाळी स्थितीनंतर शहरातील हवामान पुन्हा कोरडे झाले असून, आकाशाची स्थिती निरभ्र झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी शहरात ३८.६ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. लोहगाव केंद्रावर ३९.३ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार मतदानाच्या दिवशी मंगळवारी तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हे तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक असल्याने दिवसभर उन्हाचा चटका जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कमाल तापमानासह रात्रीच्या किमान तापमानातही वाढ होत असल्याने रात्रीचा उकाडा वाढतो आहे. सोमवारी शहरात १९.९ अंश किमान तापमान नोंदविले गेले.

उन्हात मतदार बाहेर पडणार का?

शहरातील दिवसाच्या तापमानात सध्या वाढ झाली आहे. मतदानाच्या दिवशीही उन्हाचा चटका जाणवणार आहे. सकाळी सात ते संध्याकाळ सहा या वेळेत मतदान होणार आहे. सद्य:स्थिती लक्षात घेता सकाळी दहानंतर उन्हाचा चटका जाणवण्यास सुरुवात होते. त्यानंतर चार ते साडेचापर्यंत चटका कायम असतो. अशा स्थितीत सकाळी किंवा संध्याकाळी मतदानासाठी मतदार बाहेर पडू शकतात. दुपारच्या चटक्यामध्ये मतदानासाठी किती मतदार बाहेर पडतील, याबाबत मात्र साशंकता आहे. विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी तापमानाचा पारा ४३ ते ४५ अंशांवर होता. सूर्य अक्षरश: होरपळून काढत असतानाही या भागात मतदानाची टक्केवारी चांगली राहिली. पुणे आणि बारामतीत काय चित्र असेल, हे मंगळवारीच स्पष्ट होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button