breaking-newsमुंबई

तात्पुरत्या कारागृहांत बंदोबस्त वाढवा

मुंबई : औरंगाबाद येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहांबाहेरील सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याच्या सूचना कारागृह व सुधारसेवा विभागाने सोमवारी दिल्या.

औरंगाबाद येथील तात्पुरत्या कारागृहातून दोन कैद्यांनी पोलिसांच्या हाती तुरी देत पलायन केले. यातील एक हत्येतील आरोपी असून दुसरा फसवणुकीच्या गुन्ह्य़ातील आरोपी होता. तात्पुरत्या कारागृहातील अधिकाऱ्यांचा पहारा सैल पडल्याची संधी साधून दोघांनी खिडकीचे गज वाकवले, चादरीच्या साहाय्याने पहिल्या मजल्यावरून खाली आले. या घटनेमुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू करण्यात आलेल्या तात्पुरत्या ३३ कारागृहांमधील सुरक्षा कडेकोट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या तात्पुरत्या कारागृहांमध्ये सध्या १७३९ कैदी ठेवण्यात आले आहेत.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील प्रमुख कारागृहांनी बाहेरील कोणालाही विशेषत: कैद्यांना थेट आत घेणे बंद केले. मुंबई विभागातील तळोजावगळता भायखळा, आर्थररोड, ठाणे, कल्याण कारागृहांमध्ये कैदी घेतले जात नाहीत. तळोजा कागराृहानेही थेट कैदी आत घेण्याऐवजी तात्पुरते कारागृह थाटावे, बाहेरून किंवा नव्याने आत येणारे कैद्यांना या तात्पुरत्या कारागृहात दोन आठवडयांसाठी विलगीकरणात ठेवावे, अशी योजना आखली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी खारघर येथील एक शाळा तात्पुरत्या कारागृहासाठी ताब्यात घेतली. सध्या तेथे २३६ कैदी आहेत.

कारागृह व सुधारसेवा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य कारागृहे सुटसुटीत राहावीत, बाहेरून आलेल्यांमुळे कारागृहात संसर्ग पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तात्पुरती कारागृहे सुरू करण्यात आली. साथरोग कायद्यानुसार जिल्हाधिकारी तात्पुरत्या कारागृहासाठी शाळा, सभागृहे किंवा अन्य आस्थापने ताब्यात घेतात. तेथे कारागृहांप्रमाणेच कामकाज चालते. बाह्य सुरक्षेची जबाबदारी मात्र स्थानिक पोलिसांची असते. थोडय़ाच कालावधीसाठी कैदी ठेवायचे असल्याने मुख्य कारागृहांप्रमाणे तात्पुरत्या कारागृहांची रचना नसते. त्यामुळे औरंगाबाच्या घटनेनंतर प्रत्येक तात्पुरत्या कारागृहातील अधिकरी अंमलदारांची संख्या वाढविण्यात आली आहे. कैदी बंदिस्त राहावेत या दृष्टीने चोख उपाय योजण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कारगृह अधिक्षक किंवा अधिकाऱ्यांना वरचेवर भेटी देण्याबाबत सूचीत केले असून स्थानिक पोलिसांनाही मनुष्यबळ देण्याची विनंती करण्यात आली आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button