breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तरुणांना भजी-पकोडे तळायला लावणे ही बेरोजगारांची थट्टाच – अजित पवार

  • सांगवीतील घोलप महाविद्यालयात नोकरी मेळाव्याचे उद्घाटन
  • भाषणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाजपवर टिका

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – देशात बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असताना भाजपचे नेते बेरोजगार तरुणांना भजी-पकोडे तळायला सांगतात. भजी-पकोडे तळण्याची कुठे नोकरी असते काय?, असे विधान करून राज्यकर्त्यांनी संबंध देशातील बेरोजगार तरुणांचा अपमान केला आहे. मोदी सरकारने सत्तेवर येताना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले असून युवक, महिला, सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर सडकून टिका केली.

नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या प्रांगणात आज शनिवारी (दि. 8) सकाळी साडेनऊ वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पवार यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अजित पवार यांचे चिरंजीव युवा नेते पार्थ पवार, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, प्रवक्ते फजल शेख आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, तरुणांनो बेरोजगार आहोत म्हणून खचून जाऊ नाका. कारण, खोट्या प्रसिध्दीला काही लोकं हापापले आहेत. निवडणुका डोळयासमोर ठेवून खोटी प्रसिध्दी मिळवली जात आहे. वस्तुस्थिती समोर ठेवून सरकार पाऊले उचलत नाही. नोकरी नाही मिळत म्हणून नैरोष्येपोटी समाजविघातक कृत्य करू नका. आज कामगारांच्या नगरीमध्ये रात्रीतून मोटारी जाळल्या जातात. गुन्हेगारी कृत्य वाढले आहे, याला सरकारच जबाबदार आहे, असा ठपका पवार यांनी भाजप सरकारवर ठेवला.

भाजपची संविधान बदलण्याची भाषा

परवाच महापरिनिर्वाण दिनानिमित्त घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्यासमोर आपण नतमस्तक झालो. काहीजण मात्र, त्यांचं संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. संविधान हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारं आहे. सर्वांना एकत्र ठेवणारं संविधान आहे. जम्मू-काश्मिर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते पश्चिम बंगालपर्यंत संपूर्ण भारत एकसंघ राहिला पाहिजे. एवढी ताकद संविधानात आहे. शेवटी आपण सर्वजण भारतीय आहोत. सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.

सरकारच्या भुलथापांना बळी पडू नका

भाजपतील काहीजण आंबा खालल्यानंतर मुलं होण्याची भाषा करतात. आज सायन्स कुठे चाललं, बायोटेक्नॉलॉजी काय संगत आहे. यांच्या मनात नेमकं काय चाललय हे कळत नाही. यांच्या भुलथापांना बळी न पडता तुम्ही जबाबदार नागरिक म्हणून भूमिका पार पाडा. तुमच्यावर महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून आहे. पिंपरी-चिंचवडचं भवितव्य तरुणांवर अवलंबून आहे. ही जाणिव सर्वांनी ठेवाली पाहिजे, अशी जाणिव पवार यांनी तरुणांना करून दिली.

नोकरीत वशिला संपला, आता मेरिटचे दिवस

मागील पंधरा वर्षे अर्थमंत्री म्हणून मी काम केले. त्यावेळी मेरीट आणि गुणवत्तेनुसार नोकरभरती करण्याची शिफारस केली. कारण, आता गुणवत्ता आणि मेरीटचेच दिवस आहेत. गरिबाच्या घरी जन्माला आलेला तरुण गुणवत्तेच्या जोरावर पुढे जाऊ शकतो. आता वशिल्याचे दिवस संपलेत. 40 वर्षापूर्वी कोणाचीतरी चिट्टी लिहून आणली की नोकरी मिळत असे. आता ते दिवस संपले असून गुणवत्तेचे दिवस आले आहेत. याचे भान तरुणांनी ठेवायला हवे, असे पवार यांनी तरुणांना बजावले.

रिक्त जागा भरण्यास सरकार परवानगी देत नाही

पुणे जिल्हा शिक्षण विभागात 500 हून अधिक जागा रिक्त आहेत. रयत शिक्षण संस्थेत अडीच हजार जागा रिक्त आहेत. एवढ्या जागा रिक्त का ठेवल्या जातात, हे कळायला मार्ग नाही. सरकार या भरतीला का परवानगी देत नाही, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button