तन्वी कुलकर्णी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात
- तुर्त हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार
मुंबई – बांधकाम व्यावसायीक डी. एस. कुलकर्णी यांची सुन आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेडचे संचालक शिरीष कुलकर्णींची पत्नी तन्वी कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर तुर्त सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. आधी पुणे न्यायालयात दाखल झालेल्या अर्जावर न्यायालय काय निर्णय देते ते पहा, असे निर्देश देऊन 19 जूनला अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
डीएसके डेव्हलपर्स लिमिटेडचे संचालक असलेल्या शिरीष कुलकर्णी यांचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिन फेटाळल्याने याप्रकरणी अटकेची शक्यता निर्माण झाल्याने तन्वी कुलकणी यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. तो प्रलंबित असताना त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तो अर्ज न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर आज सुनावणीला आला.
यावेळी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि सरकारी वकील ऍड. विरा शिंदे यांनी तन्वी यांचा पुणे कनिष्ठ न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज प्रलंबित असून त्यावर 19 जून रोजी सुनावणी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल न्यायालयाने घेतली. न्यायालयाने पुणे कनिष्ठ न्यायालयाला या अर्जावर 19 जून रोजी काय तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले.