breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ड्रग्जचे गुजरात कनेक्‍शन उघड; गुन्हे शाखेकडून सहा जणांना अटक

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने उघडकीस आणलेल्या मेफेड्रॉन ड्रग्जचे कनेक्‍शन गुजरातपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी ड्रग्ज बनविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या स्वयंघोषित डॉक्‍टरसह आणखी सहा जणांना गुजरात आणि मुंबईतून जेरबंद केले. महाड येथील एका वकिलाच्या फार्महाऊसमध्ये या रॅकेटमधील दोन मुख्य सूत्रधारांनी ड्रग्ज बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे समोर आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत वीस जणांना अटक केली असल्याची माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

परशुराम भालचंद्र जोगल (वय 44 , रा. ठाणे), मंदार बळिराम भोसले (वय 49, ठाणे), राम मनोहरलाल गुरबानी (वय 43, रा. वेस्ट मुंबई), अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे (वय 39, रा. ओशिवरा मुंबई, मूळ-जटनगला, बडकेली, जि. मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश), मनोज एकनाथ पालांडे (वय 40, रा. वरसे, ता. रोहा, जि. रायगड), अफजल हुसैन अब्बास सुणसरा (वय 52, रा. जोगेश्‍वरी वेस्ट, मुंबई, मूळ-मेहता, ता. बडगाम, जि. बनासकांठा, उत्तर गुजरात) अशी अटक केलेल्या सहा जणांची नावे आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार तुषार सूर्यकांत काळे (रा. बोरिवली), राकेश श्रीकांत खानिवडेकर ऊर्फ रॉकी (रा. वसई) आणि नायजेरियन व्यक्ती झुबी इफनेयी उडोको यांच्यासह इतर आरोपी सध्या कारागृहात आहेत.

आरोपी तुषार आणि राकेश यांनी महाड एमआयडीसीतील अल्केमी केमिकल्स आणि निंबस फार्म या कंपनीत, तसेच कर्जत डोंगरगाव येथील वकील जोशी यांच्या फार्महाऊसमध्ये ड्रग्ज बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे समोर आले आहे. स्वयंघोषित डॉक्‍टर असलेला आरोपी अरविंदकुमार हा एमएससी असून, ऑरगॅनिक केमिस्ट्री शिकलेला आहे. ड्रग्ज बनविण्यात तो तरबेज आहे. त्याने मेफेड्रॉन (एम. डी.) ड्रग्ज बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आरोपींकडून 35 लाख रुपये मोबदला घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर इगतपुरी (नाशिक) येथे ड्रग्ज बनविल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. महाड येथील प्रशिक्षणाच्या अनुभवातूनच तुषार आणि राकेशने रांजणगाव एमआयडीसीमधील संयोग बायोटेक लिमिटेड या बंद असलेल्या कंपनीत सुमारे 132 किलो एमडी ड्रग्ज बनवले होते. आरोपी जोगल, मंदार भोसले आणि राम गुरबानी हे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे असून, मंदार याच्यावर यापूर्वी ठाणे पोलिसांनी मोका कायद्यानुसार कारवाई केली आहे.

गुजरात कनेक्‍शन उघड..

पालांडे, अरविंदकुमार आणि अफजल यांचे गुजरात कनेक्‍शन समोर आले. तातडीने पोलिसांनी गुजरातला वडोदरा येथे जाऊन तिघांना अटक केली. शहरात ड्रग्ज पकडल्यानंतर आरोपी गुजरात येथे गेले. तिथे ते कंपनी सुरू करून ड्रग्ज बनविणार असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. महाड एमआयडीसीतील अल्केमी केमिकल्स आणि निंबस फार्म या दोन्ही कंपन्या पोलिसांनी सील केल्या आहेत. ड्रग्ज बनविण्याचे इतर केमिकल जप्त केल्याचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button