डोनॉल्ड ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्कार द्यावा- ल्यूक मेसर
वॉशिंग्टन (अमेरिका)- डोनॉल्ड ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्कार द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी ल्यूक मेसर यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी नोबेल कमिटीला एक पत्र लिहिले आहे. यापूर्वी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनीही डोनॉल्ड ट्रम्प यांना नोबेल देण्याची मागणी केली होती.
उत्तर कोरियाबरोबरचा परमाणू तणाव कमी करण्याच्या दृष्टीने डोनॉल्ड ट्रम्प यांनी जे काम केले आहे, त्यासाठी त्यांना नोबेल शांती पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी मून जे इन यांनी केली होती, आणि आता तशीच मागणे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ल्यूक मेसर यांनी केली आहे. ल्यूक मेसर यांनी नोबेल कमिटीला लिहिलेल्या पत्रावर 18 सदस्यांच्या सह्या आहेत. संपूर्ण जगाच्या विरोधाला न जुमानता उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्र कार्यक्रम चालूच ठेवला होता. परंतु ट्रम्प यांची योजना कामी आली आणि उत्तर कोरिया समझोत्यासाठी तयार झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
ऐतिहासिक कोरियन शिखर परिषदेसाठी नोबेल मिळण्यासाठी आपल्यापेक्षा डोनॉल्ड ट्रम्प हेच योग्य आहेत असे मून जेन इन यांनी म्हटले होते. मिळालेल्या माहितीनुसार डोनॉल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची भेट मे अखेरीस वा जून महिन्यात होण्याची शक्यता आहे.