breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

मुंबई: सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी परळच्या चार रहिवाशांना अटक करण्यात आली आहे. ज्या मॅनहोलमधून डॉ. अमरापूरकर वाहून गेले, त्या मॅनहोलचं झाकण ज्यांनी उघडलं होतं, त्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्यात डॉ. अमरापूरकर वाहून गेले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह वरळी समुद्रकिनाऱ्यावर सापडला होता.
सिद्धेश भेलसेकर (२५), राकेश कदम (३८), निलेश कदम आणि दिनार पवार (३६) यांना दादर पोलिसांनी अटक केली आहे. चौघांवर निष्काळजीपणामुळे मृत्यूला जबाबदार धरत भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरापूरकर जिथून वाहून गेले त्या मॅनहोलजवळच्या चाळीत हे चौघेही राहतात. पावसामुळे त्यांच्या घरात शिरलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी त्यांनी मॅनहोलचे झाकण उघडले होते.
‘आम्ही खूप लोकांचे जबाब नोंदवले. त्यातूनच ही माहिती मिळाली की या चौघांनी सेनापती बापट मार्गावरील सुपर्श इमारतीजवळचे मॅनहोल उघडले होते,’ अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. ‘त्यांना मॅनहोल उघडण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. शिवाय त्यांनी गटाराचे झाकण उघडल्यानंतर तिथे तसा धोक्याचा इशारा देणारा कोणताही फलक लावला नव्हता. यातून त्यांचा निष्काळजीपणा लक्षात येतो,’ असेही त्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दादर विभागाचे पोलीस सहआयुक्त सुनील देशमुख यांनी या चौघांना अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. शनिवारी या चौघांना अटक करण्यात आली असून सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील आठवड्यात आर्थर रोड कारागृहात त्यांची ओळख परेड घेण्यात येणार आहे.

बॉम्बे रुग्णालयात पोटविकारतज्ज्ञ म्हणून काम करणारे डॉ. अमरापूरकर २९ ऑगस्टला घरी येताना पुराच्या पाण्यात अडकले. घरापासून काही अंतरावर ते गाडीतून उतरले आणि त्यांनी चालत घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि वाहून गेले. त्यांच्या मृत्यूला राज्य सरकारने पालिकेला जबाबदार धरले. पालिका आयुक्तांनी सहआयुक्त विजय सिंघल यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते, पण पालिकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मॅनहोल उघडे टाकले नसल्याचा दावा केला.

इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने पंतप्रधान कार्यालयाकडे या प्रकरणी दाद मागितल्यानंतर तेथून राज्याच्या मुख्य सचिव सुमीत मलिक यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान अॅड. आशिष मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीत हायकोर्टाने फटकारल्यानंतर वेगाने सूत्र हलली आणि वरील अटक झाल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button