डेक्कन एक्स्प्रेसचे सारथ्य महिलांच्या हाती
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी|
पुणे-मुंबई मार्गावर लोकप्रिय असलेल्या नव्या दिमाखातील डेक्कन एक्स्प्रेसचे सारथ्य महिलांच्या हाती देण्यात आले. चालक, गार्ड अन् तिकीट तपासनीस ‘सबकुछ’ महिलाच होत्या.
नव्या रूपातील डेक्कन एक्स्प्रेस गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे रवाना झाली. महिला दिन येत्या रविवारी आहे. त्यामुळे या गाडीचे सारथ्य महिलांच्या हाती देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा, अतिरिक्त व्यवस्थापक नीलम चंद्रा यांच्या हस्ते गाडीला झेंडा दाखवून ती सोडण्यात आली.
रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्यासह वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, वरिष्ठ व्यवस्थापक गौरव झा, ‘आरपीएफ’ पोलिस आयुक्त अरुण त्रिपाठी आदी उपस्थित होते. डेक्कन एक्स्प्रेसचे सारथ्य श्रद्धा तांबे यांनी केले, तर राधा चलवादी या गार्ड होत्या. महिला तिकीट तपासनीस या गाडीत होत्या. शर्मा, चंद्रा आणि शहा यांनी नव्या गाडीची पाहणी करून प्रवासी महिलांना गुलाबाचे पुष्प दिले.