क्रिडा

डीव्हिलिअर्सच्या निवृत्तीमुळे दक्षिण आफ्रिकेला धक्‍का

जोहानसबर्ग – धडाकेबाज फलंदाज आणि स्टार खेळाडू ऍब डीव्हिलिअर्स याने काही दिवसांपूर्वी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. डीव्हिलिअर्सच्या या अनपेक्षित निर्णयामुळे दक्षिण आफ्रिकेला जबरदस्त धक्‍का बसला आहे. इतकेच नव्हे तर पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या आशा डीव्हिलिअर्सच्या निवृत्तीमुळे जवळजवळ संपुष्टात आल्या असल्याची कबुली आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघातील क्रिकेटपटूंसाठी सुरू असलेल्या वार्षिक वैद्यकीय तपासणी, तसेच तंदुरुस्ती चाचणी कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना गिब्सन यांनी डीव्हिलिअर्सच्या निवृत्तीबद्दलची वस्तुस्थिती उघड केली. निवृत्तीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी त्याच दिवशी सकाळी त्याने मला फोन करून आपल्या मनात काय आहे, याची कल्पना दिली होती, असे सांगून गिब्सन म्हणाले की, मी लगेचच त्याची भेट घेतली व त्याचा निर्णय योग्य आहे किंवा कसे याबद्दल आमच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. मी त्याचे मन वळविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. परंतु आपला निर्णय बरोबर आणि योग्य वेळी घेतला असल्याची त्याची खात्री होती.

डीव्हिलिअर्सने त्याच्या नजीकच्या सर्व मंडळींशी चर्चा केली होती आणि त्यानंतरच तो या निर्णयाप्रत येऊन पोहोचला होता. त्यामुळे त्याचे मन वळविणे अशक्‍य असल्याचे लवकरच माझ्या ध्यानात आले, असे सांगून गिब्सन म्हणाले की, डीव्हिलिअर्सचा निर्णय कायम असल्याचे समजल्यावर मला खरा धक्‍का बसला. डीव्हिलिअर्स हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विश्‍वचषक स्पर्धेत त्याच्या कामगिरीमुळे खूपच फरक पडला असता आणि हे त्यालाही माहीत आहे. तरीही त्याने बाजूला होण्याचा निर्णय घेतला.

आता आम्हाला डीव्हिलिअर्स संघात नाही ही वस्तुस्थिती स्वीकारून विश्‍वचषक स्पर्धेसाठी तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे आमचे संपूर्ण नियोजन बदलावे लागणार आहे. परंतु सुदैवाने त्याने विश्‍वचषक स्पर्धेला वर्षभर बाकी असताना हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या योजनांमध्ये बदल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. तरीही आमच्या संघात डीव्हिलिअर्स नाही, ही वस्तुस्थिती कायमच राहणार आहे. विजेतेपदाच्या आमच्या प्रयत्नांना निश्‍चितच तडा गेला आहे, असे गिब्सन यांनी सांगितले.

डीव्हिलिअर्स नसण्याची सवय करावी लागणार 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आपण थकलो असल्याचे डीव्हिलिअर्सने सांगितले आणि त्यावर मी काहीच बोलू शकलो नाही, असे सांगून गिब्सन म्हणाले की, हा निर्णय अतिशय अवघड होता. परंतु चांगली कामगिरी करीत असतानाच बाजूला होणे महत्त्वाचे होते, असे डीव्हिलिअर्सने सांगितले. त्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेसाठी, तसेच अवघ्या क्रिकेटविश्‍वासाठी निराशाजनक आहे आणि डीव्हिलिअर्स आता कधीच क्रिकेट खेळताना दिसणार नाही, हे सत्य आपल्याला स्वीकारावे लागणार आहे, असे सांगून गिब्सन म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डीव्हिलिअर्स नसण्याची आपल्याला सवय करावी लागणार आहे. अर्थातच ते सोपे नाही. परंतु आगामी विश्‍वचषक स्पर्धेत आमच्या संघात डीव्हिलिअर्स नाही, हे स्वीकारण्याची आमच्या मनाची अद्याप तयारी झालेली नाही. तरीही त्याच्या अनुपस्थितीत आम्हाला हे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button