breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ठेकेदाराने महापालिकेला लावला चूना; 96 लाखाचे बील केले अदा

कोरोना काळात ‘एक्स रे डिजीटल पोर्टेबल 100 MA मशिनअरी’ पडल्या बंद

संबंधित वरिष्ठ अधिका-यांच्या अर्थपुर्ण वाटाघाटीमुळे रुग्णालयाची लागली वाट

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या अर्थपुर्ण वाटाघाटीमुळे अनेक कारनामे आता उघड होवू लागले आहेत. कोरोना महामारीत वायसीएम, भोसरी आणि जिजामाता आयसोलेशन वाॅर्डसाठी आवश्यक एक्स रे डिजीटल पोर्टेबल 100 MA मशनअरी खरेदी केली. परंतू, ठेकेदाराने पुरवठा केलेल्या नवीन मशिन अचानक बंद पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्या प्रकरणाची चाैकशी करण्याऐवजी भांडार विभागाने संबंधित ठेकेदाराच्या काळजी पोटी तत्काळ बील अदा करण्यात आले आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी सखोल चाैकशी करुन दोषी अधिका-यावर कारवाई करावी, तसेच ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे खैरनार यांनी तक्रार केली आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना आयसोलेशन वाॅर्ड भोसरी, जिजामाता रुग्णालयास आवश्यक साहित्य पुरवठा करण्यात येणार होता. त्यात एक्स रे डिजीटल पोर्टेबल 100 MA 5 नग मशीन, मोबाईल डीआर ईक्कींपमेंन्ट अॅन्ड 100 एमए एचआर एक्स- रे 2 नग असे एकूण 95 लाख 91 हजार रुपयाची खरेदी करण्यात आली आहे. याबाबत मे. फोनिक्स मायक्रोसिस्टीम कंपनीला पुरवठा आदेश देण्यात आला होता.

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात न्युमोनियाची तपासणी करण्यास एक्स रे मशनअरी आवश्यक आहे. याच पार्श्वभुमीवर पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने रुग्णालयास एक्स रे मशिन्सची खरेदी केली. भोसरी, वायसीएम आणि जिजामाता रूग्णालयाला दिलेली एक्स रे डिजीटल पोर्टेबल 100 MA मशिनअरी वारंवार बंद पडत आहे. रूग्णालयाने प्रशासनाला वैद्यकीय विभागाकडे पत्राद्वारे तक्रार दिली आहे. त्या पत्राची दखलही घेण्यात आलेली नाही.

कोरोना संसर्गाच्या काळात एक्स रे मशीन बंद पडल्यास बाधीत रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. या मशिनची खरेदी ही बाजारभावापेक्षा वाढीव दराने केलेली आहे. ठेकेदाराकडून पुरवठा केलेल्या मशिन्स ही निविदेतील कंपनीच्या नसल्याचे म्हटले आहे. मध्यवर्ती भांडार विभागाकडून एक्स रे मशिन खरेदीसाठी राबविलेली निविदा प्रक्रिया, आणि ठेकेदाराने पुरविलेल्या मशिन्स ह्या स्पेसिफिकेशन योग्य आहे का? त्याची पुर्नतपासणी होणे गरजेचे आहे.

सर्वत्र राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना, महापालिकेला 96 लाख रुपयांच्या निकृष्ट दर्जांच्या एक्स रे मशीन देवून ठेकेदाराने महापालिकेची फसवणूक केलेली आहे. नवीन मशीन बंद पडू लागल्याने लाखो रुपयाचा चूना महापालिकेला बसला आहे. त्या प्रकरणाची कसली चाैकशी न करता त्या ठेकेदाराचे बील अदा करण्यास महापालिकेने हातघाई केलेली आहे. तसेच बंद पडलेल्या मशीन व निकृष्ट दर्जाची साहित्य उपकरणे ठेकेदाराने पालिकेच्या घशात घातली आहेत. या खरेदीची सखोल चाैकशी करुन संबंधित अधिका-यांसह ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. दोषी आढळणा-या अधिका-याचे निलंबन करावे, त्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी खैरनार यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button