breaking-newsआंतरराष्टीय

ट्रम्प यांच्यावरील आरोपांबाबत ‘व्हाइट हाऊस’ला नोटीस

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील  महाभियोगाची प्रक्रिया तीव्र करण्यात आली असून ट्रम्प यांच्यावरील आरोपाशी संबंधित कागदपत्रे ताब्यात देण्यासाठी व्हाइट हाऊसला नोटीस जारी करण्यात आली आहे.

ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष व आताच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार जो बिदेन यांच्याविरोधातील प्रकरणांची चौकशी करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदमीर झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणला होता. बिदेन यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी परदेशाची मदत घेण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला असून त्याबदल्यात युक्रेनला लष्करी मदतीचे आमिष दाखवल्याचा आरोप आहे.

महाभियोग चौकशी समितीने कागदपत्रांसाठी केलेल्या विनंत्यांना व्हाइट हाऊसने दाद दिली नाही, असे डेमोक्रॅटिक परराष्ट्र व्यवहार, गुप्तचर समितीच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. गेला महिनाभर व्हाइटहाऊसकडून पुराव्याची कागदपत्रे मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले पण त्यात यश आलेले नाही. याचा अर्थ ट्रम्प हे चौकशीला विरोध करीत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या असहकार्यामुळे आता आम्हाला व्हाइट हाऊसला नोटीस देण्यावाचून गत्यंतर नव्हते असे त्यांनी स्पष्ट केले.  व्हाइट हाऊसचे हंगामी प्रमुख मिक मुलावेनी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की १८ ऑक्टोबपर्यंत व्हाइट हाऊसने युक्रेन प्रकरणाशी संबंधित फायली ताब्यात द्याव्यात. माइक पेन्स यांना ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना दूरध्वनी केल्याची माहिती होती. पेन्स यांनी स्वत: युक्रेन नेत्याची भेट १ सप्टेंबरला घेतली होती. नंतर पेन्स यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. बिदेन यांच्याविरोधात चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लावून त्यांच्यावर चिखलफेक करण्याचा ट्रम्प  यांचा प्रयत्न होता. अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांनी युक्रेन प्रकरणात मोठय़ा प्रमाणात संदेशांची देवाणघेवाण केली असून ते संदेश काँग्रेसच्या चौकशीकर्त्यांनी जाहीर केले आहेत.  त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्यावर केलेल्या आरोपांना पाठबळ मिळाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button