breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

झाडांच्या मुळांना मोकळीक नाहीच!

न्यायालयाच्या आदेशानुसार बुंध्यांभोवतीचे सिमेंट, पेव्हर ब्लॉक हटवण्यास सुरुवात; मात्र नियमापेक्षा फारच कमी जागा मोकळी

सिमेंट, काँक्रीटीकरणाचा फास बुंध्याभोवती पडल्याने झाडे कमकुवत होत असून त्यामुळे मुंबईतील झाडे उन्मळून पडण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने झाडांच्या बुंध्यांभोवती असलेले सिमेंटीकरण हटवण्याचे आदेश पालिकेला दिले होते. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने काम सुरू केले असले तरी, ही प्रक्रिया केवळ दिखाऊपणाच ठरत असल्याची तक्रार होत आहे. मुळांना मोकळीक मिळावी यासाठी झाडाभोवतीची सुमारे एक चौरस मीटर जागा मोकळी करणे आवश्यक असताना पालिकेचे कर्मचारी एक ते दीड फूट जागा मोकळी करून काम उरकत आहेत.

पावसाळय़ात झाडे कोसळण्याच्या घटना मुंबईत वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत झाडे कोसळल्याने जीवितहानी होण्याच्या घटनांतही वाढ झाली आहे. या वर्षी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ९५ हजार झाडांच्या फांद्या छाटल्या. मात्र, त्यानंतरही झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत. या वर्षी तर सात जणांना झाड कोसळून झालेल्या दुर्घटनांत जीव गमवावा लागला.

मुंबईतील झाडे कोसळण्याला शहरातील सिमेंट काँक्रीटीकरण जबाबदार असल्याची तक्रार करत काही वृक्षप्रेमी संस्थांनी न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण हरित लवादापुढे आल्यावर लवादाने झाडांच्या बुंध्याभोवती असलेले काँक्रीटीकरण हटविण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यानुसार पालिका बुंध्यांच्या तळाचे काँक्रीटीकरण हटविणार आहे. काही ठिकाणी मुळांभोवतीचा काही फुटांचा भाग मोकळा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. झाडांभोवती किती भाग मोकळा करावा, याबाबत आयुक्त  अजोय मेहता यांनी उद्यान विभागाला अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल येण्याआधीच या संबंधीची मार्गदर्शक तत्त्वे नसताना  जुन्याच पद्धतीने झाडांभोवतीची जमीन मोकळी करून त्यावर हिरवळ पसरवली जात आहे.

वृक्षगणनेनुसार मुंबईत सध्या २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. त्यातील रस्त्यांच्या कडेला १ लाख ८५ हजार ३३३ झाडे आहेत. यापैकी काही प्रमुख रस्त्यांवरील झाडांच्या मुळांभोवतीचा परिसर मोकळा करण्यात येत आहे. सध्या महापालिका मुख्यालय, दादरचा गोखले रोड येथील रस्त्यांवरील झाडांभोवतीचा परिसर मोकळा करून त्यावर हिरवळ तयार करण्यात येत आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार झाडांभोवती एक मीटरच्या परिघात जागा मोकळी करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मरिन ड्राइव्हवगळता कुठेही चारही बाजूने १ मीटरची जागा मोकळी ठेवण्याबाबतचे निर्देश पाळण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील रस्त्यालगतच्या झाडांभोवतीचा परिसर मोकळा करण्याचे काम आधीपासूनच सुरु आहे. आता उर्वरीत झाडांभोवतीचा काँक्रीट काढण्यात येणार आहे. सर्व विभागांमध्ये हे काम केले जात आहे, असे उपायुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे. तर रस्ते आणि पदपथाच्या रुंदीनुसार झाडांच्या बुंध्याचा भाग मोकळा केला जात आहे, असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

झाडे धोकादायक कशी बनतात?

मुंबईमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात रस्ते, मलवाहिनी, जलवाहिनी तसेच पर्जन्य जलवाहिनी आदींची काम सुरू आहे. रस्त्यांच्या कडेला यासाठी खोदकाम करून या सेवासुविधांचे जाळे टाकले जात असल्याने रस्त्यालगत असलेल्या झाडांना यामुळे अपाय होतो. या बांधकामांमुळे झाडांची खोलवर जाणारी मुळे कापली जातात. तसेच झाडांच्या मुळाचा भागच कॉँक्रीटने बंद करण्यात येत असल्यानेही झाडांची वाढ होत नाही. झाडांच्या मुळांची वाढ होऊन ती जमिनीत खोलवर रुतली जात नसल्याने चांगल्या स्थितीत असणारी झाडे किरकोळ वारा-पावसात उन्मळून अथवा तुटून पडतात.

पावसाळ्यातील ४ महिन्यांत पडलेली झाडे

* रस्ते व पदपथ:  १४३

* खासगी जागांमध्ये : ३६७

* मुंबईतील एकूण झाडे : २९ लाख ७५ हजार २८३

* रस्त्यांच्या कडेला असलेली झाडे : १ लाख ८५ हजार ३३३

* खाजगी आवारांमधील झाडे : १५ लाख ६३ हजार ७०१

* सरकारी जागेतील झाडे : ११ लाख २५ हजार १८२

* विविध उद्यान आणि मैदानातील झाडे : १ लाख १ हजार ६७

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button