breaking-newsपुणेमहाराष्ट्रमुंबई

जिद्दीने उभा केलेला उद्योग उद्ध्वस्त!

लातूरमध्ये मराठा आंदोलकांकडून तोडफोड; ६० लाखांचे नुकसान

नोकरीच्या मागे न लागता स्वकष्टातून जिद्दीने उभा केलेला रेणापूर तालुक्यातील एक शेतीपूरक उद्योग ९ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलकांनी केलेल्या तोडफोडीत उद्ध्वस्त झाला आहे. रेणापूरमधील कुंभारी येथील ‘श्रीकृष्ण अवधूत अ‍ॅग्रो’ या कंपनीचे सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाले असून, दगडफेकीत कंपनीचे दोन कर्मचारीही जखमी झाले आहेत.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत ‘श्रीकृष्ण अ‍ॅग्रो’ हा मशरूम उत्पादन उद्योग व्यवस्थापनाने बंद ठेवला होता. हा कारखाना बंद असतानाच दुपारी ११.३० च्या सुमारास काही तरुणांचे टोळके कारखान्याच्या बंद प्रवेशद्वारासमोर आले. तेथील सुरक्षारक्षकाला त्यांनी दमबाजी करत दरवाजा उघडण्यास सांगितले. हा प्रकार सुरू होताच सुरक्षारक्षकाने या प्रकल्पाचे पर्यवेक्षक संतोष किशनराव भुरे यांना बोलावून घेतले. भुरे तिथे आल्यानंतर या जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली आणि दरवाजावर चढून हे सर्व आत घुसले. जमावातील प्रत्येकाच्या हातात काठय़ा, लोखंडी रॉड होते. त्यांनी कारखान्यात घुसून दिसेल ती वस्तू, खिडक्या, काचा, यंत्रसामग्री फोडण्यास सुरुवात केली. इमारतीचे नुकसान केले. कारखान्यातील फर्निचर, विद्युत उपकरणे, इनव्हर्टर, कुलर, जनरेटर, पॅकिंग बॉक्स अशा वस्तूंची तोडफोड करत मोठे नुकसान केले. गोदामात भरलेले मशरूम फेकून देत त्याची नासधूस करण्यात आली. त्यात सुमारे ६० लाख रुपयांचे हे नुकसान झाले असून, दगडफेकीत संतोष भुरे, सुरक्षारक्षक संतोष यादव हे जखमी झाले.

या प्रकरणी रेणापूर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी हणमंत मोरे, पवन मोरे, भूकंप मोरे, गोलू मोरे (सर्व रा. पोहरेगाव, ता. रेणापूर) व सूर्यकांत पाटील, महेश पाटील (रा. खानापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नवे आव्हान..

लक्ष्मण डोणे, अमोल डोणे या तरुणांनी स्वकष्टातून जिद्दीने तीन वर्षांपूर्वीच हा उद्योग उभा केला होता. यासाठी त्यांनी बँकांकडून काही कोटींचे कर्जही घेतलेले आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी उभ्या केलेल्या या व्यवसायाचे सर्वत्र कौतुक होत असताना तोडफोडीमुळे उद्योग उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे या नवउद्योजकांपुढे नव्याने उद्योग उभारणीचे आव्हान उभे राहिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button