breaking-newsक्रिडा

जाणून घ्या हे ‘डकवर्थ-लुइस’ आणि स्टर्न आहेत तरी कोण?

कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पाऊस दाखल झाला की कर्णधारांच्या डोक्यात आणि उरात धडकी भरवणारी तीन नावे म्हणजे ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’. क्रिकेट सामन्यादरम्यान पाऊस आला तर नियोजित वेळेत खेळ पूर्ण करण्याच्या उद्देशाने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी विशिष्ट षटकांमध्ये धावसंख्या गाठण्याचे लक्ष्य ठेवले जाते. यावेळी त्यांनी नक्की किती धावा कराव्यात यासाठी मागील अनेक वर्षांपासून ‘डकवर्थ-लुइस’ प्रणाली वापरली जाते. निस्सीम क्रिकेट चाहते आणि गणिताची आवड असणाऱ्यांना आकलन होऊ न शकणाऱ्या ‘डकवर्थ-लुइस’ या जोडगोळने तयार केलेल्या प्रणालीमध्ये २०१५ साली तिसऱ्याची भर पडली ती म्हणजे स्टीव्ह स्टर्न यांची. डकवर्थ-लुइस पद्धतीत सुलभीकरण करण्यात स्टर्न यांचे योगदान लक्षात घेऊन २०१५ च्या विश्वचषकापासून ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ या सुधारित नावाने ही प्रणाली अंगीकारण्यात आली आहे. पण हे तिघेजण नक्की कोण आहेत यावर टाकलेली ही नजर..

फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस हे दोघेही सांख्यिकीतज्ज्ञ आहेत. या दोन गणितज्ञांनी क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्य आल्यास आकडेमोडीसंदर्भात काय तडजोड करता येईल यासंदर्भात काढलेला गणितीय तोडगा म्हणजे डकवर्थ-लुईस प्रणाली. १९९७ साली झिमाब्वे आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यात हा नियम पहिल्यांदा वापरण्यात आला. तेव्हापासून आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने) ही प्रणाली वनडे आणि टी-२० सामन्यांदरम्यान पाऊस झाल्यास वापरण्यास सुरुवात केली.

फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस (फोटो सौजन्य: द टेलिग्राफ)

डवर्थ-लुईस-स्टर्न प्रणालीचा जन्म

मूळच्या अमेरिकेच्या असलेल्या स्टीफन स्टर्न यांनी २०१४ मध्ये डकवर्थ-लुईस पद्धतीची आकडेमोड अधिक सुरळीत व्हावी यासाठी काही बदल सुचवले. स्टर्न हे ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्यापूर्वी क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठात सांख्यिकी प्राध्यापक व संगणक प्रणाली तज्ज्ञ म्हणून काम करायचे. ते ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यानंतर त्यांना क्रिकेटची गोडी लागली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांमध्ये उडणारा गोंधळ लक्षात घेऊन त्यांनी डकवर्थ-लुईस पद्धतीच्या अभ्यासाला सुरुवात केली. स्टर्न यांनी केलेल्या संशोधनानुसार अल्गोरिदमच्या माध्यमातून डकवर्थ-लुईस पद्धतीमधील आकडेमोड अधिक सोप्या पद्धतीने करत सुधारित लक्ष्य ठेवण्यासंदर्भातील नियम तयार केले. अखेर त्यांनी २०१४ साली या प्रणालीमधील बदल आयसीसीला सुचवले. त्यांचा या प्रणालीवरील अभ्यास आणि त्यांनी सुचवलेल्या बदलांना आयसीसीने मान्यता दिली. आयसीसीने दिलेली मान्यता हेच स्टर्न यांच्या अनेक वर्षांच्या संशोधनाचे फलित आहे.

स्टीफन स्टर्न (फोटो सौजन्य: बॉण्ड युनिव्हर्सिटी)

आधी काय होतं?

डकवर्थ लुईस या प्रणालीचा स्वीकार करण्यापूर्ण सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आल्यास ‘रेन रुल’ वापरला जायचा. या नियमानुसार सरासरी धावसंख्येच्या आधारे धावांच्या पाठलाग करणाऱ्या संघासमोर नवीन लक्ष्य ठेवले जायचे. सन १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध इंग्लंड सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने हा नियम वापरण्यात आला होता. सामना सुरु असताना पाऊस आला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला १३ चेंडूत विजयासाठी २२ धावांची गरज होती. मात्र पाऊस थांबल्यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकन संघासमोर एका चेंडूत २२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. या घटनेनंतर रेन रुल प्रणालीमधील त्रुटी प्राकर्षाने समोर आल्या.

(फोटो सौजन्य: ईएसपीएन क्रिकइन्फो)

भारतीय पर्यायाकडे दूर्लक्ष

किचकट स्वरूपामुळे डकवर्थ-लुइस प्रणालीवर सातत्याने टीका होत होती. भारतात केरळमधील अभियंता व्ही. जयदेवन यांनी डकवर्थ-लुइसला पर्याय ठरेल, अशी ‘व्हीजेडी’ प्रणाली मांडली. या प्रणालीला मान्यता मिळावी, यासाठी जयदेवन यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र विविध प्रशासकीय पातळ्यांवरील अनास्थेचा जयदेवन यांना फटका बसला आहे.

स्टर्न यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांच्या समीकरणांचा प्रणालीत समावेश करण्यात आल्याने ‘व्हीजेडी प्रणाली’ आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्तित्वात येण्याआधीच कायमची गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. तरी भारतामध्ये काही ठिकाणी स्थानिक सामन्यांमध्ये या पद्धतीचा अनेकदा वापर करण्यात आला आहे. मात्र बीसीसीआयने औपचारिकदृष्ट्या या प्रणालीचा स्वीकार केलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button