breaking-newsराष्ट्रिय

जाणून घ्या, छत्तीसगडमध्ये भाजपाच्या पराभवाची पाच कारणे

‘चावलवाला बाबा’ अशी ओळख असलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हादरा बसला आहे. सलग चौथ्यांदा सत्ता मिळवण्याचे रमण सिंह यांचे स्वप्न भंगले असून या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. भाजपाला ९० पैकी फक्त १४ जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसने तब्बल ६६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर अन्य पक्षांना १० जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपाच्या पराभवाचा घेतलेला हा आढावा…

१. प्रशासनातील भ्रष्टाचार आणि कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष
छत्तीसगडमध्ये प्रशासनावर सैल झालेली पकड हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. वन, महसूल विभागातील अनागोंदी काऱभार वाढला होता. तसेच तांदूळ, बाजार समिती, कर्ज अशा विविध विभागांमधील भ्रष्टाचारही पराभवासाठी कारणीभूत ठरला.  तसेच पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) झालेली घसरण यामुळे शेतकरी वर्गही नाराज होता. छत्तीसगडमधील ‘परिवर्तन लाटे’साठी ही दोन महत्त्वाची कारणे आहेत.

२. तिकीटवाटप
छत्तीसगडमधील निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर करताच पक्षात नाराजी पसरली. ३६ विद्यमान आमदार आणि १४ पैकी १३ मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. यावर नाराजीही व्यक्त झाली होती. मात्र, रमण सिंह हे यावर ठाम होते. जनतेला ग्राह्य धरण्याची घोडचूक त्यांना महागात पडली.

३. नक्षलीभागात भाजपाविरोधी लाट
बस्तर आणि सरगुजा या नक्षली भागात भाजपाविरोधात मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. बस्तरमधील १२ पैकी १२ जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. तर सरगुजा येथे १४ पैकी १० जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. यावरुन डाव्या पक्षांनी भाजपाविरोधात ताकद पणाला लावल्याचे दिसते. इथे काँग्रेसला मतदानाऐवजी भाजपाविरोधात मतदान असा संदेश देण्यात आला आहे. बस्तरमध्ये झालेले ८४ टक्के मतदान हे याचे लक्षण मानता येईल.

४. अजित जोगी
अजित जोगी यांच्या जनता काँग्रेस छत्तीसगड या नवख्या पक्षाने पाचपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. अजित जोगी यांच्या पक्षाचा काँग्रेसऐवजी भाजपाला सर्वाधिक फटका बसला आहे. अनुसूचित जातीतील समाजासाठी आरक्षित असलेल्या जागांपैकी १० पैकी ९ जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. दलित समाज जोगी यांच्या पाठीशी असून दलित मते काँग्रेस आणि अजित जोगी यांच्या पक्षात विभागली गेली. याचा प्रामुख्याने भाजपाला फटका बसला. जोगी यांनी यंदा बहुजन समाज पक्षाशी युती केली होती.

५. २०१३ मध्येच सत्ताबदलाचे संकेत?
छत्तीसगडमध्ये २०१३ साली भाजपाला ४१ टक्के मते मिळालेली होती. तर मतांची संख्या ५३ लाख ६५ हजार २७२ इतकी होती. तर काँग्रेसला ४०. ०३ टक्के मते मिळाली आणि मतांची संख्या ५२ लाख ६७ हजार ६९८ इतकी होती. भाजपा आणि काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत फक्त ०.७ टक्क्यांचा फरक होता. तर फक्त १० जागांच्या फरकाने भाजपाचा विजय झाला होता. त्यामुळे काँग्रेसला फक्त १ टक्का मते फिरवून निवडणूक जिंकणे महत्त्वाचे होते. प्रस्थापितांविरोधातील लाट पाहता हा आकडा काँग्रेससाठी आव्हानात्मक नव्हता. आता यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला नेमकी किती मते मिळाली ही आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button