breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जळगावात परतीच्या पावसाने पिकं झोपवली

जळगाव | सलग चार ते पाच वर्षांपासून भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या जळगाव जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पूर्ण हंगामात गरजेपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तसेच आता आठवड्याभरापासून परतीचा जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. ओल्या दुष्काळाने खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यात यावर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने थोडा ब्रेक घेतला. त्यानंतर पूर्ण सप्टेंबर महिना पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला. त्यामुळे खरीप हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यात येणारे मूग, उडीद या कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने कडधान्य पिके अक्षरशः जळून गेली. या धक्क्यातून सावरत नाही तोच आता शेतकऱ्यांसमोर दुसरे संकट उभे राहिले आहे.

आठवड्याभरापासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू असल्याने ज्वारी, बाजरी, मका पिकांचे नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस तसेच सकाळच्या वेळी पडणारे धुके यामुळे ज्वारी, बाजरी, मक्याची कणसे काळी पडली आहेत. काही ठिकाणी तर कणसांना कोंब फुटले आहेत. कापणी झालेली कणसे देखील भिजून कुजली आहेत. पूर्वहंगामी आणि हंगामी कापसाच्या पिकाला देखील पावसाचा फटका बसला आहे.

अतिपावसामुळे कापसाची बोंडे कुजली आहेत. बोंडांमधून बाहेर आलेला कापूस भिजून खराब झाला आहे. अनेक शेतांमध्ये वादळामुळे पिके जमिनदोस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button