breaking-newsपुणे

चौकाचौकांत मृत्यूचे टांगते सांगाडे

  • महापालिका अधिकाऱ्यांशी सलगी करून मोक्याची ठिकाणे पटकाविण्याचा सपाटा

मंगळवार पेठेतील गजबजलेल्या शाहीर अमर शेख चौकात रेल्वे प्रशासनाच्या मोकळ्या जागेलगत उभारण्यात आलेले अतिभव्य जाहिरात फलक शुक्रवारी दुपारी रिक्षा तसेच वाहनांवर कोसळला आणि या दुर्घटनेत हकनाक चार नागरिकांचा बळी गेला. अपघातात दहा जण गंभीर जखमी झाले. शाहीर अमर शेख चौकातील फलक कोसळण्याच्या घटनेनंतर चौकाचौकात असणारे जाहिरात फलक धोकादायक पद्धतीने लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

शहरातील अनेक महत्त्वाचे चौक, रस्त्यांवर धोकादायक फलक  लावण्यात आले आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून जाहिरात फलकांना परवानगी देण्यात येते. उत्पादक जाहिरात संस्थांशी संपर्क साधतात. जाहिरात संस्था आणि फलक लावणारे ठेकेदार मोक्याच्या ठिकाणी जाहिरातींचे फलक लावतात. आकाशचिन्ह विभागातील अधिकाऱ्यांशी सलगी करून मोक्याची ठिकाणे पटकाविली जातात. लक्ष्मी रस्ता, लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, अप्पा बळवंत चौक, लक्ष्मी रस्त्यावरील लिंबराज महाराज चौक, कुंटे चौकात इमारतींवर जाहिरात फलक लावण्यात आले आहे. अनेक इमारतीच्या गच्चीवर हे फलक लावण्यात आले आहेत. लोखंडी खांबाचा आधार घेऊन तयार केलेल्या सांगडय़ांवर (मेटल फ्रेम) जाहिरात फलक लावले जातात. काही जाहिरात फलकांमुळे इमारत व्यापली गेली आहे. काही जाहिरात फलकांचा आकार दुमजली इमारतीएवढा आहे. हे जाहिरात फलक ऊन, वारे, पावसात असतात. जोराचे वारे आल्यास लोखंडी खांब किंवा जाहिरात फलक तुटतात.

कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौक, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक, बंडगार्डन रस्त्यावर, भैरोबा नाला भागात असे अतिभव्य जाहिरात फलक आहेत. जाहिरात फलकांचा आकार अतिभव्य असून अशा प्रकारचे जाहिरात फलक कोसळल्यास गंभीर स्वरूपांच्या घडना घडून नागरिकांचा बळी जाऊ शकतो, हे शुक्रवारी दुपारी शाहीर अमर शेख चौकात घडलेल्या दुर्घटनेनंतर अधोरेखित झाले आहे.  पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक महत्त्वाचे चौक तसेच रस्त्यांवर जाहिरात फलक आहेत. या भागातही जाहिरात फलक धोकादायक पद्धतीने लावले आहेत.

जाहिरात फलकांचे बळी

गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सोसाटय़ाचा वारा आल्यानंतर वेगवेगळ्या घटनांमध्ये जाहिरात फलक कोसळून दोन नागरिकांचे बळी गेले होते. वाकड भागातील भूमकर चौक परिसरात जाहिरात फलक कोसळून एक पादचारी महिला मृत्युमुखी पडली होती. त्यानंतर भोसरी भागात जाहिरात फलक कोसळून एका चहा विक्रेत्याचा मृत्यू झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button