breaking-newsपिंपरी / चिंचवड

चोरीच्या पैशांमधून मुलांचे शिक्षण, पिंपरीत १५० वाहने चोरणाऱ्याला अटक

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाकड पोलिसांनी १५० चारचाकी वाहने चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली आहे. राजू जावळकर (वय ५०) आणि सोमनाथ चौधरी अशी या आरोपींची नावे असून दोघेही कार चोरी केल्यावर भंगारात विकायचे. यातून मिळणाऱ्या पैशांमधून दोघेही संसार आणि मुलांच्या शिक्षणासाठी येणारा खर्च भागवायचे.

चिंचवडमध्ये राहणारा राजू बाबुराव जावळकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अहमदनगर,पुणे आणि सातारा या परिसरात चारचाकी गाडी चोरी केल्याप्रकरणी जवळपास १५० गुन्हे दाखल आहेत. तो नुकताच तुरुंगातून सुटला होता. तर त्याचा साथीदार सोमनाथ सुभाष चौधरी याच्यावर वाहनचोरीचे २५ गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राहटणी येथून छोटा हत्ती (चारचाकी गाडी) चोरली होती. त्याचा तपास वाकड पोलीस करत होते. पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,छोटा हत्ती खेड शिवापूर येथे आहे. त्यानुसार त्यांचे पथक रवाना झाले, त्या ठिकाणी दोन्ही आरोपी हे गाडी कट करत होते. त्यांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले.  कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला. आत्तापर्यंत त्यांच्या चौकशीतून सात गुन्हे उघड झाले आहेत.

राजू जावळकरला दोन मुले असून ते नेवासा येथील बोर्डिंगमध्ये शिक्षण घेत आहेत.त्यासाठी राजू हा दरवर्षी दोघांची ८० हजार रुपये फी भरतो. तर पत्नी ही गृहिणी आहे. आई-वडील हे पुण्याजवळील एका खेड्यात राहतात. राजू हा गेली २० वर्ष वाहनचोरीचे गुन्हे करत आहे. चार चाकी चोरुन ती भंगारात विकायचा. कवडीमोल किंमतीमध्ये भंगारात विकायचा. या पैशांमधून तो संसार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवतो. राजू इयत्ता ७ वी पर्यंत शिकलेला असून कमी कष्टात जास्त पैसे कमावण्यासाठी तो चोरी करु लागला. दरम्यान, चोरी केलेल्या गाडीमध्ये जीपीएस सिस्टम तर नाही ना हे पाहण्यासाठी चोरी केलेली गाडी निर्जनस्थळी ठेवली जायची. तिथे दोन दिवस पोलीस किंवा गाडी मालक तर येत नाही ना याची खात्री करून ते गाडी भंगारात काढायचे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button