चिखलीतील 210 लाभार्थ्यांना पालिकेकडून मिळाले हक्काचे घर
- महापौरांच्या हस्ते काढली संगणकीकृत सोडत
- पाच इमारतींमधील सदनिकांचे केले वाटप
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर १७ आणि १९ चिखली येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून घरकुल प्रकल्पातील ५ सोसायट्यांच्या इमारतीमधील एकुण २१० लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत आज काढण्यात आली.
चिंचवड येथील अटो क्लस्टर येथे संगणकीय सदनिका सोडत महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते काढण्यात आली. या कार्यक्रमास सहा आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहा आयुक्त आण्णा बोदडे, कार्यालयीन अधिक्षक महेंद्र चौधरी व मुख्य लिपिक सुनिल माने, राजेश जाधव, लिपिक अंजली खंडागळे, मोहिद्दीन शेख, सुवर्णा केदारी, संकेत लोंढे तसेच समन्वयक अशोक हंडीबाग, दर्शन शिरुडे, आश्विनी शिंदे व आरती शहारे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. १२५ इमारत क्र. डी-२४ चे अध्यक्ष अनिल गंगारात भोसले, सोसायटी क्र. १२६ इमारत क्र. डी-२३ चे अध्यक्ष प्रल्हाद रामभाऊ कांबळे, सोसायटी क्र. १२७ इमारत क्र. डी-२१ चे अध्यक्ष गोविंद गुंडेराव तांबवाडे, सोसायटी क्र. १२८ इमारत क्र. सी-३३ चे अध्यक्ष संजय कोंडिबा शिंदे व सोसायटी क्र. १२९ इमारत क्र. डी-२२ चे अध्यक्ष गजानन कडू बेदरे यांचा सहा. आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी लाभार्थींनी हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. घराचा वापर स्वत: करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारत भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे, असा संदेश महापौर राहुल जाधव यांनी लाभार्थ्यांना दिला.