‘चाईल्ड पॉर्न’ : फेसबुक, गुगल, व्हॉट्सअॅपला लाखाचा दंड
नवी दिल्ली: चाईल्ड पॉर्न आणि बलात्काराच्या व्हिडीओविरोधात पावले न उचलणाऱ्या सोशल नेटवर्किंग साईट्सना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. न्यायालयाने फेसबुक, व्हॉट्सअॅप, गुगल इंडिया, याहू आणि मायक्रोसॉफ्ट यांना प्रत्येकी 1 लाखाचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती बी लोकूर आणि न्यायमूर्ती उमेश ललित यांच्या खंडपीठाने 16 मे रोजी हा निर्णय दिला.
सोशल साईट्सवर अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ आहेत. चाईल्ड पॉर्न आणि बलात्काराच्या व्हिडीओवरुन, सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने या सोशल साईट्सना तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले होते. तसेच हे व्हिडीओ हटवण्यासाठी काय उपाययोजना केली त्याबाबतची माहिती द्या, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते.
मात्र यापैकी कोणत्याही वेबसाईटने या व्हिडीओंबाबत काहीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाने या वेबसाईट्सना 15 जूनपर्यंत उत्तर देण्याचे आदेशही दिले आहेत. या वेबसाईट्सनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करावे, त्यासोबत दंड म्हणून 1 लाख रुपये जमा करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.