breaking-newsपुणेमहाराष्ट्र

चांदणी चौक उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी वाहतूक प्रकल्पांचा निधी वळविला

चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी १८५ कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून राज्य शासनाने जाहीर केला असला तरी तीन टप्प्यात मिळणारा हा निधी आणि राज्य शासनाच्या अटींमुळे भूसंपादन रखडू नये, यासाठी शहरातील वाहतूक प्रकल्पांचा निधी या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी वळविण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. चांदणी चौक उड्डाणपुलासाठी तब्बल १८५ कोटी रुपये वाहतूक प्रकल्पातून देण्यात येणार आहेत.

कोथरूड परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौक येथे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या उड्डाणपुलासाठी भूसंपादनाचा मोठा अडथळा असून त्यासाठी निधीची चणचण पहिल्यापासूनच महापालिका प्रशासनाला जाणवत होती. यापूर्वी महापालिकेने ८५ कोटी रुपयांची तरतूद भूसंपादनासाठी केली होती. मात्र ती अपुरी असल्याचे निदर्शनास आले होते. कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या स्थानिक आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी सातत्याने पाठपुरावा करून या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून १८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यामुळे भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. पण निधी मंजूर करताना राज्य शासनाने घातलेल्या अटींमुळे वाहतूक प्रकल्पांचा निधी या पुलाच्या कामासाठी वळविण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी भूसंपादन करता यावे यासाठी सन २०१७-१८ च्या महापालिका अंदाजपत्रकात ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या तरतुदींमधून बाधित मिळकतींना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्य शासनाने मंजूर केलेला १८५ कोटींचा निधी महापालिकेला तीन टप्प्यात मिळणार आहे. पहिल्या हप्त्याचा निधी मिळाल्यानंतर जागा मालकाला तो दिल्यानंतर त्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच जागा ताब्यात आल्याचा तपशील राज्य शासनाला द्यावा लागणार आहे. त्यानंतरच पुढील हप्त्याची रक्कम महापालिकेला मिळणार आहे. विशेष बाब म्हणून निधी मंजूर झाला असला तरी प्रशासकीय मान्यतेसाठी लागणारा कालावधी विचारात घेता भूसंपादन प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्त १८५ कोटी रुपयांचा निधी वाहतूक प्रकल्पातून या उड्डाणपुलासाठी देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

दरम्यान, १८५ कोटी रुपयांचा निधी कोणत्या प्रकल्पातून वर्ग करायचा, याबाबत प्रशासनापुढे संभ्रम होता. नगरसेवकांना प्रभागात काम करण्यासाठी अंदाजपत्रकात असलेला निधी वळविण्याबाबतही प्रशासनाकडून विचार करण्यात आला होता. मात्र त्याला विरोध होण्याची आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे वाहतुकीच्या प्रकल्पातूनच हा निधी उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले आणि तसा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला. वाहतूक विभागाअंतर्गत प्रस्तावित भुयारी मार्ग, पदपथ आणि अन्य छोटय़ा-मोठय़ा प्रकल्पातून हा निधी देण्यात आला आहे.

सर्वकंष वाहतूक आराखडय़ानुसार काम

चांदणी चौक येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जात असून या चौकातून मुंबई, सातारा, कोकण, पुणे शहर या भागामध्ये वाहतूक होत असते. चांदणी चौक येथे वेगवेगळे पाच रस्ते मिळतात. भौगोलिक परिस्थितीमुळे तीव्र चढउतार आणि अरुंद रस्ते यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने र्सवकष वाहतूक आराखडा तयार करण्यासाठी सन २०१३ मध्ये समिती नेमण्यात आली होती. उड्डाणपुलासाठी खर्च मोठा असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यासाठी निधी देण्याची सहमती दर्शविली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यानुसार तज्ज्ञ सल्लागार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका यांच्यात करार करण्यात आला.

अनेकविध सोयी-सुविधा

महामार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल, अंडरपास, रॅम्प आणि महापालिकेच्या विकास आराखडय़ानुसार दोन्ही बाजूने सेवा रस्ते (सव्‍‌र्हिस रोड) विकसित करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचे नियोजन सिग्नल फ्री होणार असून अपघाताचे प्रमाण कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्रिस्तरीय करारानुसार या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूचे रस्ते महापालिकेने हस्तांतरित करणे अपेक्षित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button